पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री १२.०० वाजेपर्यंत सवलत; निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन बंधनकारक - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 4, 2026

पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री १२.०० वाजेपर्यंत सवलत; निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन बंधनकारक



*गणेशोत्सवात ध्वनिक्षेपक वापराबाबत महत्त्वाची सूचना* 
पुणे जिल्ह्यात सहा दिवस रात्री १२.०० वाजेपर्यंत सवलत; निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन बंधनकारक

*बारामती, दि. ०४ सप्टेंबर २०२६ :* 

आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळे, पदाधिकारी, ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणा वापरणारे व्यावसायिक तसेच नागरिकांनी ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे श्री. जितेंद्र डुडी यांनी ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २००० तसेच ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ मधील तरतुदींनुसार सन २०२६ मध्ये ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेच्या वापरासाठी विशिष्ट सण-उत्सवांच्या दिवशी वेळेची मर्यादा शिथिल करण्याबाबत आदेश निर्गमित केला आहे.

सदर आदेशानुसार गणपती उत्सव सन २०२६ मध्ये खालील सहा दिवशी सकाळी ६.०० वाजल्यापासून रात्री १२.०० वाजेपर्यंत, निर्धारित ध्वनीमर्यादेचे पालन करून ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यासाठी वेळेची सवलत देण्यात आली आहे.

दि. १९/०९/२०२६, शनिवार – गणेशोत्सवाचा सहावा दिवस

दि. २०/०९/२०२६, रविवार – सातवा दिवस

दि. २२/०९/२०२६, मंगळवार – नववा दिवस

दि. २३/०९/२०२६, बुधवार – दहावा दिवस

दि. २४/०९/२०२६, गुरुवार – अकरावा दिवस

दि. २५/०९/२०२६, शुक्रवार – बारावा दिवस / अनंत चतुर्दशी


रात्री १२ वाजेपर्यंतची सवलत म्हणजे अमर्याद आवाजाची परवानगी नाही

गणेशोत्सव मंडळांनी विशेषतः नोंद घ्यावी की, वरील दिवशी रात्री १२.०० वाजेपर्यंत दिलेली सवलत ही केवळ वेळेच्या मर्यादेतील शिथिलता आहे. संबंधित परिसरासाठी निर्धारित केलेल्या ध्वनीमर्यादेपेक्षा जास्त आवाज करण्याची परवानगी यामुळे मिळत नाही.

ध्वनी प्रदूषण नियमांनुसार संबंधित क्षेत्राच्या झोनिंगप्रमाणे निश्चित करण्यात आलेल्या ध्वनीमर्यादेचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधितांवर बंधनकारक राहील. परवानगीमध्ये नमूद केलेल्या अटी, ध्वनीमर्यादा आणि वेळेचे उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी संबंधित आयोजक व यंत्रणा वापरणाऱ्या व्यक्तींची राहील.

*शांतता क्षेत्राला सवलत लागू नाही* 

मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही विशेष सवलत शांतता क्षेत्रामध्ये लागू राहणार नाही. रुग्णालये, न्यायालये, शैक्षणिक संस्था तसेच नियमानुसार घोषित शांतता क्षेत्रांमध्ये लागू असलेल्या ध्वनीविषयक निर्बंधांचे पूर्णपणे पालन करणे आवश्यक आहे.

इतर दिवशी नियमित वेळेचे नियम लागू

गणेशोत्सवातील वरील अधिसूचित सहा दिवस वगळता अन्य दिवशी ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेच्या वापराबाबत प्रचलित नियमांनुसार निर्धारित वेळेचे पालन करणे आवश्यक राहील. त्यामुळे प्रत्येक मंडळाने आपल्या परवानगीतील वेळ व अटी काळजीपूर्वक तपासून त्यानुसारच ध्वनी यंत्रणेचा वापर करावा.

पोलीस प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार ध्वनीपातळीची तपासणी करण्यात येणार असून निर्धारित ध्वनीमर्यादा, वेळेची अट किंवा सक्षम प्राधिकरणाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास लागू कायदे व नियमांनुसार योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

*पोलीस प्रशासनाचे आवाहन* 

गणेशोत्सव हा श्रद्धा, भक्ती, आनंद आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. उत्सवाचा आनंद साजरा करताना रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची प्रत्येक मंडळाने सामाजिक जबाबदारी म्हणून दक्षता घ्यावी.

“वेळेची सवलत जरूर आहे, मात्र ध्वनीमर्यादेची सवलत नाही” ही बाब लक्षात ठेवून सर्व गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचे पालन करावे आणि गणेशोत्सव शांततामय, सुरक्षित व शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रभारी पोलिस निरीक्षक 
बारामती शहर पोलीस स्टेशन

No comments:

Post a Comment