बारामती हादरली 16 वर्षीय विद्यार्थिनीची टेरेसवरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, September 3, 2026

बारामती हादरली 16 वर्षीय विद्यार्थिनीची टेरेसवरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू

बारामती हादरली 16 वर्षीय विद्यार्थिनीची टेरेसवरून उडी; उपचारादरम्यान मृत्यू
अभ्यास व परीक्षेचा ताण असल्याची पालकांची प्राथमिक माहिती; बारामती शहर पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी

बारामती:- दि. 04 सप्टेंबर 2026 :

बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने दि. 04/09/2026 रोजी पहाटे इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली उडी मारल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे सुमारे 05.00 वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

सदर विद्यार्थिनी बारामती येथील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास व परीक्षेचा ताण घेत होती. अभ्यास होत नसल्याबाबत तसेच परीक्षेचे टेन्शन येत असल्याबाबत ती आई-वडिलांकडे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दि. 04/09/2026 रोजी रात्री ती सुमारे 12.30 वाजेपर्यंत अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येत असल्याचे सांगून ती इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली न आल्याने तिचे वडील तिला पाहण्यासाठी वर गेले. त्यावेळी ती टेरेसच्या कड्यावर खाली पाय सोडून बसलेली दिसली. वडिलांनी तिला आवाज देऊन विचारणा केली असता तिने त्यांच्याकडे पाहून अचानक टेरेसवरून खाली उडी मारल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून प्राप्त झाली आहे.

विद्यार्थिनी इमारतीच्या समोरील भागात खाली पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली. आई-वडील व शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना काही काळ ती शुद्धीवर होती व तिने आईकडे पिण्यासाठी पाणी मागितल्याची माहिती पालकांनी दिली आहे. त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली व उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

सदर घटनेबाबत विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी अथवा नातेवाईकांनी सद्यस्थितीत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार किंवा संशय व्यक्त केलेला नाही. अभ्यास व परीक्षेचा ताण असल्याची प्राथमिक माहिती पालकांकडून प्राप्त झाली असली तरी, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.

सदर विद्यार्थिनीबाबत यापूर्वीही घरातून निघून गेल्याची नोंद बारामती शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. त्या संदर्भातील पूर्वीच्या प्रकरणातील कागदपत्रे, जबाब व तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या बाबींची सद्य घटनेच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात येत आहे.

प्राथमिक चौकशीत सदर विद्यार्थिनीकडे स्वतःचा वैयक्तिक मोबाईल फोन नसल्याची माहिती मिळाली आहे. ती आवश्यकतेनुसार तिच्या आई-वडिलांच्या मोबाईल फोनचा वापर करत होती. त्या अनुषंगाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मोबाईलमधील घटनेशी संबंधित उपलब्ध डिजिटल माहितीची पडताळणी करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

तसेच घटनास्थळाची पाहणी, आवश्यक पंचनामे, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे, डिजिटल बाबी तसेच पालक, नातेवाईक, मैत्रिणी, सहाध्यायी, शिक्षक व आवश्यक संबंधित व्यक्तींचे जबाब घेऊन घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती निष्पन्न करण्याच्या दृष्टीने बारामती शहर पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

अभ्यासाचा ताण हे पालकांकडून सांगण्यात आलेले प्राथमिक कारण असून, त्याव्यतिरिक्त वैयक्तिक, शैक्षणिक, कौटुंबिक किंवा अन्य कोणती पार्श्वभूमी होती काय, तसेच कोणत्याही व्यक्तीकडून त्रास, दबाव किंवा आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखी बाब घडली होती काय, याचीही निष्पक्षपणे पडताळणी करण्यात येत आहे.

सदर प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील चौकशी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे.

अल्पवयीन मृत विद्यार्थिनीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. नागरिक व प्रसारमाध्यमांनीही तिचे नाव, छायाचित्र किंवा ओळख पटेल अशी वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

प्रभारी पोलीस निरीक्षक 
बारामती शहर पोलीस स्टेशन
पुणे ग्रामीण

No comments:

Post a Comment