बारामती नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी-कचरा टाकल्याचा आरोप; अ‍ॅड. अमोल सातकर व चार साथीदारांविरोधात FIR - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, September 30, 2026

बारामती नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी-कचरा टाकल्याचा आरोप; अ‍ॅड. अमोल सातकर व चार साथीदारांविरोधात FIR

बारामती नगरपरिषदेच्या प्रवेशद्वारासमोर दुर्गंधीयुक्त पाणी-कचरा टाकल्याचा आरोप; अ‍ॅड. अमोल सातकर व चार साथीदारांविरोधात FIR
शासकीय कामकाजात अडथळा, सार्वजनिक अस्वच्छता निर्माण केल्याचा फिर्यादीचा आरोप; BNS सह विविध कायद्यांतील ११ कलमांचा FIR मध्ये उल्लेख

बारामती, दि. ३० सप्टेंबर २०२६ : बारामती नगरपरिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वाहनातून दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल व कचरा टाकून अस्वच्छता निर्माण केल्याच्या आरोपावरून अ‍ॅड. अमोल सातकर व त्यांच्या चार अन्य साथीदारांविरोधात बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नगरपरिषदेचे प्रभारी मुकादम अक्षय महेश भिवाल (वय ३०) यांच्या फिर्यादीवरून नोंदविण्यात आल्याचे उपलब्ध FIR मध्ये नमूद आहे.

FIR नुसार अक्षय भिवाल हे सन २०२० पासून बारामती नगरपरिषदेत प्रभारी मुकादम म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली सफाई कर्मचारी काम करतात. ३० सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता भिवाल हे नेहाल वाल्मिकी, प्रसाद हिवरकर यांच्यासह नगरपरिषदेच्या पार्किंगजवळ उपस्थित होते. मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक प्रतीक जाधव व विशाल जगताप कर्तव्यावर असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

टाटा एसी वाहनातून कचरा आणल्याचा आरोप

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी अ‍ॅड. अमोल सातकर व त्यांचे चार साथीदार टाटा एसी वाहन क्रमांक MH-42-BU-8007 मधून आले. या वाहनामध्ये दुर्गंधीयुक्त पाणी, कुजलेले अन्नपदार्थ, चिखल व कचरा होता आणि तो नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर टाकण्यात आल्याचा आरोप FIR मध्ये करण्यात आला आहे.

भिवाल , सुरक्षा रक्षक व इतरांनी संबंधितांना हे कृत्य बेकायदेशीर असल्याचे सांगून थांबविण्याचा प्रयत्न केल्याचा दावा फिर्यादीत आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून कृत्य सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

फिर्यादीने या प्रकारामुळे नगरपरिषद कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराचा परिसर विद्रूप झाला, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आणि नागरिक व कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यामध्ये अडथळा निर्माण झाला, असे म्हटले आहे. संबंधितांनी शासकीय कामकाजात गंभीर अडथळा निर्माण केल्याचाही आरोप FIR मध्ये आहे.

FIR मध्ये कोणकोणती कलमे?

उपलब्ध FIR मध्ये खालील कायदे व कलमांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे:

* भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 — कलम 125, 132, 221, 271, 272, 280 आणि 292
* महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 — कलम 229 व 230
* महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, 1995 — कलम 3 व 4
* मुंबई पोलीस अधिनियम — कलम 115

अशा प्रकारे FIR मध्ये विविध कायद्यांतील एकूण ११ कलमांचा उल्लेख करण्यात आला आहे. या कलमांची प्रकरणातील नेमकी लागूता आणि आरोप सिद्ध होतात की नाहीत, हे पोलीस तपास व पुढील न्यायालयीन प्रक्रियेत ठरेल.

तपास विलास विठ्ठल मोरे यांच्याकडे

FIR नुसार गुन्हा नोंदवून प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल विलास विठ्ठल मोरे (HC 1750) यांच्याकडे देण्यात आला आहे.

या घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी काय होती, कचरा व दूषित पाणी कुठून आणण्यात आले, संबंधित वाहन कोणाच्या ताब्यात होते आणि घटनास्थळी नेमका काय प्रकार घडला, याबाबत पोलीस तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
चौकट..
*बारामती शहरातील जळोची येथील ड्रेनीज पाईप लाईन फुटलेली असल्याने याठिकाणी असलेल्या लोकवस्तीत घाण पाण्यामुळे दुर्गधी सुटली होती,घाण वास येत होता याबाबत वारंवार गेली पाच महिने झाले तक्रार करून ही या घाण पाण्याचे नियोजन होत नव्हते म्हणून अखेर याठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी हे घाण पाणी बारामती नगर परिषद येथे आणून ओतले असल्याचे सांगण्यात आले.*

No comments:

Post a Comment