दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना चारा आणि पाण्यासाठी मदत करा;खा. सुळे यांचे जिल्ह्यातील बड्या सहकारी संस्थांना आवाहन..
पुणे :- पावसाने ओढ दिल्यामुळे सध्या संपूर्ण राज्यातच तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत चारा डेपो, छावण्या व जनावरांना पाण्यासाठी सहकारी संस्थानी शेतकऱ्यांना मदत करावी, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मदतीचे आवाहन करत त्यांनी मध्यवर्ती बँकेसह पुणे जिल्ह्यातील बड्या दूध संस्था आणि साखर कारखान्यांना पत्र लिहिले आहे.
पुणे जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ - कात्रज, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना - सोमेश्वर नगर, इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना - भवानीनगर आणि बारामती तालुका सहकारी दुध उत्पादक संघ या पुणे जिल्ह्यातील काही महत्वाच्या आणि बड्या सहकारी संस्थांना खासदार सुळे यांनी पत्र लिहित दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
आपल्या भागाच्या विकासआणि प्रगतीमध्ये सहकारी संस्थांचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले आहे. आता संकटाच्या प्रसंगी या संस्था मोठ्या मनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येतील, असा आपल्याला विश्वास आहे, असे सुळे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. संपूर्ण राज्यातच अत्यंत गंभीर व तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस न पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून जनावरांच्या चार्याचा प्रश्न बिकट बनला आहे. येणारे पुढील ८ ते १० महिने या परिस्थितीचे नियोजन कसे करायचे आणि शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा कसा द्यायचा, हा मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर आहे, असेही सुळे यांनी पुढे नमूद केले आहे.
ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी स्वतः या परिस्थितीची पाहणी करून राज्य सरकारकडे विविध मागण्या व सूचना पत्राद्वारे केल्या असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पाठपुरावा सुरु आहे, अशी आठवण करून देत त्यांनी आपल्या पत्रात आपल्या भागाच्या विकासात आणि प्रगतीमध्ये सहकारी संस्थांचे योगदान नेहमीच मोलाचे राहिले आहे. अशा संकटाच्या प्रसंगी या संस्था मोठ्या मनाने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येतील, असा आपल्याला पूर्ण विश्वास आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
या संस्थांनी पुढाकार घेऊन आपापल्या क्षेत्रात जनावरांसाठी चारा डेपो व चारा छावण्या तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने सुरू कराव्यात. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी शक्य ती मदत किंवा टँकरची सोय करावी. दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना व त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाला दिलासा देण्यासाठी सामाजिक दायित्वाच्या (CSR/सहकारी निधी) माध्यमातून विशेष मदत योजना राबवावी. संकटाच्या या काळात आपण सर्वजण एकत्र येऊन शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा देऊ, याची आपल्याला खात्री असून या मागण्यांचा सकारात्मक विचार करून सहकारी संस्था निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, असेही त्यांनी पुढे नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment