कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न ऐरणीवर; जनशक्ती संघाचा आंदोलनाचा इशारा.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, October 30, 2026

कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न ऐरणीवर; जनशक्ती संघाचा आंदोलनाचा इशारा..

कंत्राटी कामगारांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न ऐरणीवर; जनशक्ती संघाचा आंदोलनाचा इशारा..
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, उद्यान तसेच इतर विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस देण्यात यावा आणि ऑक्टोबर महिन्याचा पगार दिवाळीपूर्वी जमा करण्यात यावा, या मागणीसाठी जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी निवेदन देऊनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने दिनांक ४ नोव्हेंबर २०२६ रोजी काम बंद ठेवून मोर्चा काढण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

बारामती नगरपरिषदेच्या विविध विभागांमध्ये अनेक कंत्राटी कामगार प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. शहर स्वच्छ ठेवणे, नागरिकांना पाणीपुरवठा करणे, उद्यानांची देखभाल करणे तसेच नगरपरिषदेची विविध कामे नियमितपणे पार पाडण्यात या कामगारांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. मात्र, दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या काळात या कामगारांना बोनस आणि वेळेवर वेतन मिळणे आवश्यक असतानाही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे.

जनशक्ती कंत्राटी कामगार संघाच्या वतीने प्रशासनाकडे दोन प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. बारामती नगरपरिषदेच्या आरोग्य, पाणीपुरवठा, उद्यान व इतर सर्व विभागांतील कंत्राटी कामगारांना नियमानुसार दिवाळी बोनस देण्यात यावा, तसेच ऑक्टोबर २०२६ महिन्याचा पगार १ नोव्हेंबर २०२६ रोजी सर्व कंत्राटी कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला योग्य ते आदेश द्यावेत व तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, प्रशासनाकडून दखल न घेतल्यामुळे ४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, गुणवडी चौक येथून गांधी चौक मार्गे बारामती नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्या मान्य होईपर्यंत नगरपरिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे. अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गौरव अहिवळे यांनी माहिती दिली.

सदर निवेदन देताना जनशक्ती कंत्राटी कामगार संघाचे संस्थापक अध्यक्ष गौरव रणधीर अहिवळे,बारामती शहराध्यक्ष आकाश शिंदे,सदस्य नाना बगाडे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. प्रशासनाने दिवाळीपूर्वी कामगारांच्या मागण्यांची पूर्तता करून त्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment