दौंड पुणे मेमुचा मार्ग मोकळा..खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, April 4, 2021

दौंड पुणे मेमुचा मार्ग मोकळा..खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

दौंड पुणे मेमुचा मार्ग मोकळा..खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश*

पुणे, दि. ४ (प्रतिनिधी) - दौंड ते पुणे दरम्यान येत्या ८ एप्रिल रोजी 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरू होत आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या रेल्वेसाठी सुळे या रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत होत्या. त्याला यश आले असून दौंड ते पुणे दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. लवकरच अन्य सर्वच प्रवाशांना या गाडीतून प्रवास करता येईल, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सुळे यांनी दिली आहे. 
दौंड येथून पुण्यात रोजच्या रोज प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. यात कर्मचारी, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतीच्या विविध कामांसाठी ये जा करणारे शेतकरी, वैद्यकीय सुविधांसाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि अन्य अत्यावश्यक सेवांसाठी ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांचाही समावेश आहे. नव्याने सुरू होत असलेली मेमू ही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू होत आहे. असे असले तरी आगामी काळात सर्वच प्रवाशांना या गाडीने प्रवास करता यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेकडे तसा पाठपुरावा करण्यात येईल. त्यालाही अपेक्षित यश येईल, असा विश्वास असे सुळे यांनी व्यक्त केला आहे. 
दौंड मार्गे पुढे जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेगाड्या जरी असल्या तरी निव्वळ दौंड-पुणे अशी स्वतंत्र गाडी असावी, अशी येथील प्रवाशांची गरज होती. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने रेल्वे मंत्रालय, रेल्वेचे पुण्यातील विभागीय कार्यालय, प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करत होत्या. इतकेच नाही, तर पुणे ते बारामती दरम्यान सुद्धा मेमू सुरू व्हावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. नुकतेच म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर मागण्यांचे निवेदनही दिले होते. त्यात दौंड पुणे मेमू बरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधित अनेक प्रश्नांवर चर्चा देखील केली होती आणि लवकरात लवकर हे प्रश्न सोडवावेत, नव्याने मेमू गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी केली होती. या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून येत्या गुरुवारपासून म्हणजे ८ एप्रिल पासून दौंड पुणे मेमू सुरू होत आहे.
 त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment