खडकवासला डावा कालवा रस्ता एनडीए गेटपर्यंत वाढवण्यास अखेर मंजुरी..खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

खडकवासला डावा कालवा रस्ता एनडीए गेटपर्यंत वाढवण्यास अखेर मंजुरी..खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश

*खडकवासला डावा कालवा रस्ता एनडीए गेटपर्यंत वाढवण्यास अखेर मंजुरी*
*खा. सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश*
*नगरसेवक सचिन दोडके यांचा प्रस्ताव मान्य*
पुणे, दि. २८ (प्रतिनिधी) - खडकवासला डावा कालव्यावरील रस्ता नव्याने पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या कोंढवे धावडे, शिवणे ते कोंढवा गेट (एनडीए प्रवेशद्वार) पर्यंत वाढवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या भागातील कोंडी फुटून वाहतूक सुरळीत होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सचिन दोडके यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या रस्त्याला मंजुरी दिली आहे. 
या रस्त्याला मंजुरी दिल्याबद्दल खासदार सुळे यांनी जयंत पाटील यांचे विशेष आभार मानले आहेत. डावा कालव्यावर कृषी महाविद्यालय ते शिवणे येथील शिंदेपूल हा रस्ता सध्या महापालिकेच्या जुन्या हद्दीपर्यंतच आहे. पाटबंधारे विभागाला पालिका त्याचे भाडेही देते. गेल्या काही वर्षांत कोंढवे धावडे, शिवणे, उत्तमनगर या भागात प्रचंड लोकवस्ती वाढली असून पुढे बहुलीपर्यंत सध्या असलेल्या एकमेव रस्त्यावर या सर्व गावांचा ताण येतो. अगदी सांगरूण ते निळकंठेश्वर पर्यंतच्या सर्व गावांसाठी एकच रस्ता असल्याने या रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी होते. विशेषतः कोंढवा गेट ते वारजे पर्यंत वाहनांच्या प्रचंड वर्दळीमुळे कोंडी होऊन कित्येकदा वाहतूक ठप्प होते. यावर मार्ग काढण्यासाठी डावा कालव्यवरील पर्यायी रस्ता लवकरात लवकर सुरू व्हावा, तसेच तो शिंदे पुलापासून कोंढवा गेटपर्यंत पुढे वाढवण्यास परवानगी मिळावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी होती. त्यानुसार खासदार सुप्रिया सुळे आणि नगरसेवक सचिन दोडके हे सातत्याने पाठपुरावा करत होते. 
याबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाटबंधारे विभागाकडून अहवाल मागवून अखेर या रस्त्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच हा रस्ता तयार होऊन कोंढवा गेट ते वारजे पर्यंत वाहतूक कोंडी टळण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या जुन्या हद्दीपर्यंत सध्या रस्ता आहे. तो पुढे वाढवण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी, अशी मागणी सुळे यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. नगरसेवक सचिन दोडके यांनी तसा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात तीन कोटी इतक्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच हे काम सुरू होईल, असे सचिन दोडके यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment