उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा_ - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Saturday, May 8, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा_

_उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ परिस्थितीसह उपाययोजनांचा आढावा_
*‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी*
-                *-उपमुख्यमंत्री अजित पवार*                            
बारामती, दि. 8:-  बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांचे नागरीकांनी काटेकोरपणे पालन करावे. ‘कोरोना’ बाधित रुग्णांना योग्य आणि तातडीचे उपचार मिळण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन करावे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, कोणत्याही परिस्थितीत ‘कोरोना’चा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या. शासनाच्या मदतीपासून कोणीही गरजू वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. 
          येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात ‘कोविड -19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थिती आणि उपाययोजनांची आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती प्रमोद काकडे, नगरपरिषद उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर, तहसिलदार विजय पाटील, नगरपालिकेचे मुख्याधिकारी किरणराज यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विश्वास ओव्हाळ, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, शहर पोलीस निरिक्षक नामदेव शिंदे , ग्रामीण पोलीस निरिक्षक महेश ढवाण, माजी जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम सभापती संभाजी होळकर, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, गट नेता सचिन सातव  आदीमान्यवरांसह विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी  उपस्थित होते.
            उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व सध्या उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची माहिती वरिष्ठ वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.  उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बारामती तालुक्यातील ‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या निर्बंधांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. लहान मुलांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी योग्य ते नियोजन करावे. ऑक्सिजन व रेमडीसीवरचे योग्य प्रकारे नियोजन करुन ‘कोरोना’ बाधित रूग्णांना वेळवर उपचार मिळणे आवश्यक आहे. कोरोनाचे लक्षण दिसल्यास रूग्णाला तात्काळ उपचार मिळणे आवश्यक आहे. कोरोना महामारीच्या संकट काळात शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य उपलब्ध होणे आवश्यक आहे, त्यासाठी प्रशासनाने योग्य प्रकारे नियोजन करावे. शासनाच्यावतीने देण्यात येणारी मदत आणि शिवभोजन थाळीची सेवा योग्य प्रकारे सुरु ठेवण्यासाठी प्रशासनाने दक्षता घ्यावी. कोणीही गरजू मदतीपासून वंचित राहू नये, याची काळजी घ्यावी. रूग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. बारामती येथील महिला रूग्णालयात जनरेटर बसवून घेण्यात यावे. सर्व रूग्णालयामध्ये स्वच्छता ठेवावी असे, निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करावे. आवश्यक त्या आरोग्य सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात. लसीकरणाचे योग्य ते नियोजन करावे. नागरिकांनी सामाजिक अंतर, सॅनिटायझर , मास्क या  त्रिसूत्रीचा अवलंब करावा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी बारामती शहरासह तालुक्यातील कोरोनाची सद्यस्थिती व कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबतची माहिती दिली. तसेच यावेळी  तहसिलदार विजय पाटील यांनी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत वाटप करण्यात आलेले अन्नधान्य व यापुढील नियोजनाची माहिती दिली. विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नातू फांऊडेशन, पुणे व डेक्कन मेकॅनिकल आणि केमिकल कंपनी (डिमेक) एमआयडीसी, बारामती यांच्या सौजन्याने देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभाग यांच्या कार्यालयातील नविन वाहनांचे उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. यावेळी राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिक्षक संतोष झगडे व राज्य उत्पादक शुल्क दौंडचे निरिक्षक विजय मनाळे व नातू फांऊडेशनच्या प्रभा नातू  व ‘डिमेके’चे नागेश कोरे  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment