खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पार पडला दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 17, 2021

खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पार पडला दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा*

*खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून पार पडला दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा*
*लवकरच विभागवार मेळावे घेऊन सामुदायीक विवाह सोहळ्याचे मोफत आयोजन*
पुणे, दि. १७ (प्रतिनिधी) - मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अपंग हक्क विकास मंच आणि पुणे जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून आज पुण्यात दिव्यांग वधू-वर परिचय मेळावा पार पडला. राज्यातील गोंदिया भंडारा जिल्ह्यापासून अगदी मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यातूनही काही तरुण तरुणी या मेळाव्यात सहभागी झाले होते. 
पुण्यातील मार्केट यार्डजवळ असलेल्या निसर्ग मंगल कार्यालयात पार पडलेल्या या मेळाव्यात सहभागी झालेल्या सुमारे पाचशे तरुण-तरुणींपैकी सहा जोडपयांचे विवाह निश्चित झाले. आगामी काळात ही सर्व माहिती ऑनलाईन अपलोड करण्यात येणार असून त्याद्वारे आज आलेल्या सर्व तरुण तरुणींना माहिती पाठवण्यात येणार आहे. त्यायोगे आणखी जेवढे विवाह निश्चित होतील, त्या सर्वांचे विवाह येत्या डिसेंबर महिन्यात खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी १२ डिसेंबर रोजी बारामती येथे सामुदायिक विवाह सोहळ्यात विवाह लावून देण्यात येणार आहेत. याचा संपूर्ण खर्च खासदार सुप्रिया सुळे या स्वतः करणार असून त्यासाठी प्रत्येक जोडप्याला विवाहासाठी आवश्यक असणारे सर्व साहित्य, वधू वरांचे कपडे, जेवण, आणि अन्य सर्व खर्च करण्यात येणार आहे. 
आज झालेल्या मेळाव्यात ठिकठिकाणाहुन आलेल्या विवाहेच्छूक तरुण तरुणींसाठी चहा, नाष्टा, जेवण आणि अन्य सगळी व्यवस्था करण्यात आली होती. त्या प्रत्येकाला टोकण क्रमांक देऊन समदेशकाबरोबर चर्चा, स्वतःच्या मतानुसार जोडीदार निवडण्याची मुभा, तो निवडण्यासाठी दिलेल्या टोकण क्रमांकानुसार पाहणी करणे, स्वतः एकमेकांशी चर्चा करणे, स्वतः मुलामुलींनी एकमेकांशी बोलणे, त्यानंतर आपापल्या पालकांशी स्वतःच ओळख करून देणे असे नियोजन करण्यात आले होते. आलेल्या सर्व प्रतिनिधींकडून आधीच फॉर्म भरून घेतले होते, त्यात त्यांचे नाव, गाव, वय, दिव्यांगत्व प्रमाण, रक्तगट आणि त्यांना स्वतःला वाटले तरच जात किंवा धर्माची माहिती संकलित करण्यात आली होती. 
या मेळाव्याला भेट देत स्वतः खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी कोणाची काही अडचण आहे, किंवा कसे याबाबत त्यांच्याशी थेट संवाद साधत माहिती घेतली. कोरोना साथीमुळे गेल्या दोन वर्षांपासून हा मेळावा पुढे ढकलण्यात येत होता. आज अखेर योग्य ती खबरदारी आणि सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या आरोग्याची पुरेपूर काळजी घेत आम्ही हा मेळावा आयोजित केला आहे, अशी माहिती यावेळी सुळे यांनी दिली. ज्येष्ठ समाजसेविका नसिमा हुर्जूक यांनीही या मेळाव्यास भेट देऊन सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधीना शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी समन्वयक म्हणून जिल्हा अपंग पुनवर्सन केंद्राचे नंदकुमार फुले, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे विजय कान्हेकर, अशोक सोळंके, दीपिका शेरखाने, सुकेशिणी मर्चंडे, विष्णू वैरागकर, बाळासाहेब जगताप, अमेय अग्रवाल, सागर कान्हेकर, दिव्यांग कार्यकर्ते भाग्यश्री मोरे, मिनीता पाटील, दत्तात्रय भोसले, अभय पवार आदींनी काम पाहिले. कान्हेकर यांनी मेळाव्याचे प्रास्ताविक केले, तर शेरखाने आणि रमेश बागले यांनी सूत्रसंचलन केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या कर्णबधिर प्रतिनिधींसाठी तेजस्विनी तळगूळकर यांनी दुभाषक म्हणून काम पाहिले. 
*चौकट*
*विभागवार मेळावा घेण्याची मागणी*
या मेळाव्यात सहभागी प्रतिनिधींशी संवाद साधताना अनेकांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे अशाच प्रकारे विभागवार मेळावा घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याला लागलीच होकार देत सुळे यांनी लवकरच असे मेळावे घेऊ, असे आश्वासन दिले. येत्या काही दिवसांत ठिकठिकाणी असे मेळावे घेऊन खासदार शरद पवार यांच्या वाढदिवशी बारामती येथे सामुदायिक विवाह सोहळा घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment