*“एक तारीख एक तास” स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन, रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यभर मोहिम* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Friday, September 29, 2023

*“एक तारीख एक तास” स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन, रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यभर मोहिम*

*“एक तारीख एक तास” स्वच्छता उपक्रमात महाराष्ट्राला अव्वल आणूया" मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन, रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यभर मोहिम*
मुंबई, दि. २९ : - स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देऊया, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

“स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात “एक तारीख एक तास” या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभाग नोंदवू शकणार आहेत. गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात  सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्व पटवून दिले जाईल.

याबाबतच्या आवाहनात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, स्वच्छता  आपल्या सर्वाच्या दैनंदिनीतील महत्वाची गोष्ट आहे. स्वच्छता आपल्या आयुष्यात समृद्धी आणते. आरोग्य आणि परिसराची स्वच्छता यांचा दृढ संबंध आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यापासून ते अनेक थोर राष्ट्र पुरूष साधू-संतानीही स्वच्छतेबाबत आपल्याला धडे घालून दिले आहेत. याच अनुषंगाने आपल्या सर्वांना “स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” हे अभियान यशस्वी करायचं आहे. “एक तारीख एक तास” या उपक्रमाला स्वच्छता लोकचळवळीचे रूप द्यायचे आहे. त्यासाठी प्रत्येकाला आपला एक तास तास स्वच्छतेसाठी द्यायचा आहे. आपण, आपले कुटुंबिय किंवा सहकारी जिथे कुठे असाल, तिथे आपण स्वच्छता मोहिम राबवून या अभियानात योगदान द्यायचे आहे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्षभरापूर्वी आपल्या राज्यात स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियान-२ चा शुभारंभ केला. त्यातून महाराष्ट्र कचरामुक्त आणि स्वच्छ असावा असे ध्येय घेऊन आता वाटचाल करत असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, “महाराष्ट्राला अनेक थोरा-मोठ्यांनी परिसर स्वच्छता आणि आरोग्यदायी सवयीचा मंत्र दिला आहे. संत गाडगेबाबांनी हाती झाडू घेऊन स्वच्छतेचे धडे दिले आहेत. आता या धड्यांची आपल्याला उजळणी करायची आहे. आपआपल्या परिसरात महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच गावा-गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या पुढाकारांनी स्वच्छता मोहिम राबवायची आहे. साचलेला कचरा, राडा-रोडा-डेब्रीज हटवायचे आहेत. यात आपल्या सर्वांच्या मदतीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था, महसूल आणि जिल्हा प्रशासन सज्ज राहील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे

“स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. या अभियानानंतर आपल्याला १५ डिसेंबर २०२३ पर्यंत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा आणि मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा ही देखील यशस्वी करायची आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल. चला महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छ, सुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया,” असेही मुख्यमंत्र्यानी आवाहन केले आहे.


No comments:

Post a Comment