बारामतीत नाकाबंदीचा धाक,470 किलो गांजा टाकून आरोपी फरार..
बारामती(संतोष जाधव ):-दि. 28/02/2026 रोजी पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड यांच्या नियंत्रणाखाली बारामती विभागात राबविण्यात आलेल्या नाकाबंदी, रात्रगस्त, वाहन तपासणी व कागदपत्र पडताळणी मोहिमेमुळे एक मोठी कारवाई यशस्वीरीत्या उघडकीस आली आहे.
सदर विशेष मोहिमेदरम्यान संशयित गुन्हेगारांवर कडक नजर ठेवण्यात आली होती. पोलीस यंत्रणेच्या सततच्या दबावामुळे व प्रभावी नाकाबंदीमुळे अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणारे आरोपी घाबरून गेले व त्यांनी मौजे जळोची, पिंपळी रोड परिसरातील शेताच्या मोकळ्या रानात गांजाचे दोन मोठे ड्रम टाकून पळ काढला.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, सदर ड्रममध्ये एकूण सुमारे 2 कोटी 35 लाख रुपये किंमतीचा एकूण 470 किलो गांजा आढळून आला. ही कारवाई बारामती विभागातील अंमली पदार्थ विरोधातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
प्राथमिक तपासातून असे निष्पन्न होत आहे की, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर विक्रीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात गांजा बारामती विभागात आणण्यात आला होता, मात्र पोलिसांच्या कडक कारवाईमुळे आरोपींना तो टाकून पळ काढावा लागला.
या संपूर्ण कारवाईत प्रभारी पोलीस निरीक्षक व त्यांच्या पथकाने तत्परतेने कार्य करून मोठा अनर्थ टाळला असून, पोलीस दलाच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे व पोलीस दलाबद्दल आदर निर्माण झाला आहे.
पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल यांच्या तसेच अपर पोलिस अधीक्षक श्री गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक श्री चिवडशेट्टी यांच्या प्रभावी नियोजन व नेतृत्वामुळेच ही मोठी कारवाई शक्य झाली असून, त्यांच्या विशेष प्रयत्नांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.
बारामती पोलिसांनी अंमली पदार्थांविरुद्धची कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, नागरिकांनीही संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप चालू आहे.
No comments:
Post a Comment