वाहन चालवितांना स्वयंशिस्त महत्वाची-प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम..
बारामती, दि.२१: रस्त्यावर वाहन चालवितांना स्वयंशिस्त महत्वाची असून स्वतःसोबत इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे; रस्ते सुरक्षा विषयक नियमांचे पालन केल्यास आपल्याला अपघात टाळता येईल, असे प्रतिपादन प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले.
इंदापूर येथे परिवहन कार्यालय, पोलीस स्टेशन, कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय आणि विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा जनजागृती फेरी व रक्तदान शिबीराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पद्माकर भालेराव, विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. आर. देशपांडे, प्राचार्य डॉ. जीवन सरवदे,राष्ट्रीय सेवा योजना विभाग, विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
श्री. निकम म्हणाले, परिवहन विभागाच्यावतीने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत 'रस्ता सुरक्षा अभियान' राबविण्यात येत असून त्यानंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे ब्रीद वाक्य ‘परवाह’ असे असून 'परवाह' म्हणजे काळजी घेणे. त्यामुळे वाहन चालविताना आपल्या जीवाची काळजी घ्यावी, असेही श्री. निकम म्हणाले.
श्री. कोकणे म्हणाले, अपघात टाळण्यासाठी नागरिकांनी वाहन चालवितांना रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करावे. वाहनांची संबंधित आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावी, असे श्री. कोकणे म्हणाले.
श्री. भालेराव म्हणाले, रस्ते अपघातात २५ ते ४५ या वयागटातील युवकांचे अपघाती मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहन चालविण्यापूर्वी वाहतुकीच्या नियमांची माहिती करुन घेतली पाहिजे. वाहनांचा अपघात विमा काढून घ्यावा. वाहन चालवितांना मोबाईलवर बोलू नये, असेही श्री. भालेराव म्हणाले.
डॉ. देशपांडे म्हणाले, रस्ते सुरक्षा अभियानात परिवहन विभाग आणि पोलीस प्रशासनाला महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी नेहमीच सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य करतात, यापुढे असेच सहकार्य करण्यात येईल, असे डॉ. देशपांडे म्हणाले. डॉ. सरवदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
No comments:
Post a Comment