बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, February 19, 2026

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन.

बनावट वेबसाईटस्‌, ॲप आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सावध राहा; परिवहन विभागाचे नागरिकांना आवाहन.
बारामती, दि. १९ : वाहनधारक आणि चालकांची आर्थिक फसवणूकीचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने बनावट वेबसाईटस्‌, संशयास्पद मोबाईल ॲप्स (एपीके) आणि खोट्या ई-चलन लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन यांसारख्या सेवांच्या नावाखाली अनेक नागरिकांची वैयक्तिक माहिती व आर्थिक व्यवहारांची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.

फसवणूक करणारे मोबाईल एसएमएस किंवा व्हॉट्सॲप संदेशांद्वारे ‘आपल्या वाहनाचे चलन बाकी असून त्वरित दंड भरा’ तसेच ‘वाहन चालविण्याचा परवाना संस्पेंड होणार असून त्वरित तपासणी करा’ अशा संदेशांसह अनधिकृत पेमेंट लिंक पाठवून पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत. परिवहन विभागाने याबाबत सांगितले की, विभागीय परिवहन कार्यालय किंवा परिवहन विभाग नागरिकांना कधीही व्हॉट्सअॅप वरून पेमेंट लिंक पाठवत नाही. तसेच ‘RTO Services.apk’, ‘mParivahan_Update.apk’, ‘eChallan Pay.apk’ अशी अज्ञात एपीके फाईल्स डाउनलोड केल्यास मोबाईलमधील ओटीपी, बँकिंग माहिती आणि इतर संवेदनशील माहिती चोरी होण्याचा धोका आहे.

नागरिकांनी वाहन नोंदणी सेवा (VAHAN) – https://vahan.parivahan.gov.in  ड्रायव्हिंग लायसन्स सेवा (SARATHI) – https://sarathi.parivahan.gov.in  परिवहन सेवा https://www.parivahan.gov.in  तसेच ई-चलन पोर्टल https://echallan.parivahan.gov.in  या gov.in डोमेनच्या अधिकृत सरकारी संकेतस्थळांचाच वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे .com, .online, .site, .in किंवा इतर कोणत्याही डोमेनवरील वेबसाइटवर वाहनधारकांनी माहिती नोंदवू नये. कोणताही संशयास्पद संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यानंतर तात्काळ नॅशनल सायबर क्राईम पोर्टलचे https://www.cybercrime.gov.in सायबर फसवणूक हेल्पलाइन क्रमांक १९३० किंवा जवळचे जिल्हा सायबर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

0000000

No comments:

Post a Comment