१५ गुन्ह्यांतील नॉन बेलेबल वॉरंटधारक फरार आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांच्या धाडसी कारवाई पुढे शरणागती.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 27, 2026

१५ गुन्ह्यांतील नॉन बेलेबल वॉरंटधारक फरार आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांच्या धाडसी कारवाई पुढे शरणागती..

१५ गुन्ह्यांतील नॉन बेलेबल वॉरंटधारक फरार आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांच्या धाडसी कारवाई पुढे शरणागती..
बारामती:- बारामती शहर पोलीसांनी अत्यंत धाडसी, कायदेशीर, शिताफीपूर्ण आणि नियोजनबद्ध कारवाई करत तब्बल १५ गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेला सराईत फरार आरोपी शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके, रा. मळद, ता. बारामती, जि. पुणे यास अखेर जेरबंद करण्यात मोठे यश संपादन केले आहे. अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेला सातत्याने चकवा देत पोलिस व न्यायालयीन यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण करणारा हा आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून या धडाकेबाज कारवाईमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सदर आरोपीविरुद्ध बारामती शहर पोलीस स्टेशन, बारामती तालुका पोलीस स्टेशन तसेच वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे विविध गुन्हे दाखल असून खालील गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते.

१) FIR क्र. 10/2011 – वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन – स्पेशल केस MSEB/1400005/2012
२) FIR क्र. 94/2011 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./1600111/2013
३) FIR क्र. 6/2012 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – स्पेशल केस MSEB/1400058/2013
४) FIR क्र. 22/2012 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – स्पेशल केस MSEB/1400040/2013
५) FIR क्र. 20/2012 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – स्पेशल केस MSEB/1400039/2013
६) FIR क्र. 16/2012 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – स्पेशल केस MSEB/1400038/2013
७) FIR क्र. 386/2014 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – R.C.C./16/2016
८) FIR क्र. 429/2014 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./1600624/2015
९) FIR क्र. 15/2016 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./188/2017
१०) FIR क्र. 769/2018 – बारामती शहर पोलीस स्टेशन – सेशन्स केस क्र.126/2019
११) FIR क्र. 1026/2018 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./579/2023
१२) FIR क्र. 155/2021 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./166/2022
१३) FIR क्र. 159/2021 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./453/2021
१४) FIR क्र. 19/2021 – बारामती शहर पोलीस स्टेशन – R.C.C./307/2021
१५) FIR क्र. 128/2021 – बारामती तालुका पोलीस स्टेशन – R.C.C./298/2021

विविध गुन्ह्यांमध्ये न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केल्यानंतर आरोपीने न्यायालयीन प्रक्रियेपासून जाणीवपूर्वक पळ काढण्यास सुरुवात केली होती. न्यायालयाकडून वारंवार समन्स, नोटिसा तसेच वॉरंट बजावण्यात येऊनही आरोपी कोणत्याही सुनावणीस हजर राहत नव्हता. परिणामी संबंधित न्यायालयांनी त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वॉरंट जारी केले होते. न्यायालयीन आदेशांचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या या आरोपीचा शोध घेण्यासाठी बारामती शहर पोलीस सातत्याने प्रयत्नशील होते.

दिनांक 24/05/2026 रोजी सकाळी सुमारे 07:00 वा. बारामती शहर पोलीसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती प्राप्त झाली की, शंकर उर्फ पोक्या प्रकाश आडके हा दशविधी कार्यक्रमाकरिता आपल्या मूळ गावी आला आहे. माहिती अत्यंत संवेदनशील व महत्त्वाची असल्याने पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे व पोलीस शिपाई वैभव मदने यांनी कोणताही वेळ न दवडता तत्काळ पथक तयार करून संबंधित ठिकाणी धाव घेतली.

पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच आरोपीस पोलिसांची चाहूल लागली आणि त्याने चित्रपटातील थरारक दृश्यालाही मागे टाकेल अशा पद्धतीने पळ काढण्यास सुरुवात केली. स्वतःस अटक होऊ नये यासाठी आरोपीने थेट करा नदीच्या उंच भिंतीवरून नदीत उडी घेतली. मात्र बारामती शहर पोलिसांनी कोणतीही भीती न बाळगता आणि जीवाची पर्वा न करता त्याच्या मागे धाव घेतली. नदीतून पळत सुटलेला आरोपी काही वेळातच नदीकाठची भिंत चढून जवळील दाट उसाच्या फडात शिरला. उंच वाढलेले उसाचे पीक, अरुंद पायवाटा आणि पूर्ण परिसरातील शांतता यामुळे आरोपीचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.

मात्र “गुन्हेगार कितीही चलाख असला तरी कायद्यापासून कायम लपून राहू शकत नाही” हा निर्धार मनात ठेवून बारामती शहर पोलिसांनी स्थानिक नागरिकांची मदत घेत परिसरात कसून शोधमोहीम सुरू ठेवली. जवळपास दीड तास सुरू असलेल्या या थरारक शोधमोहीमेनंतर उसामध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या. पोलिसांनी तात्काळ संपूर्ण परिसराला घेराव घालत अत्यंत शिताफीने आरोपीस पकडून ताब्यात घेतले. अनेक वर्षांपासून पोलिसांना आणि न्यायालयाला चकवा देणारा आरोपी अखेर बारामती शहर पोलिसांच्या धाडसी कारवाईसमोर निष्प्रभ ठरला.

सदर आरोपीस कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माननीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता, माननीय न्यायालयाने आरोपीस येरवडा कारागृह, पुणे येथे न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपीस जेलमध्ये रवानगी करण्यात आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांकडून बारामती शहर पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.

या कारवाईमुळे न्यायालयीन प्रक्रियेपासून पळून जाणाऱ्या तसेच वारंवार कायद्याला आव्हान देणाऱ्या आरोपींना स्पष्ट संदेश मिळाला आहे की, बारामती शहर पोलीस कोणत्याही गुन्हेगारास कायद्यापासून दूर पळू देणार नाहीत. नदी, शेत, अंधार किंवा कोणतेही लपण्याचे ठिकाण गुन्हेगाराला वाचवू शकत नाही, कारण कायद्याचा हात अधिक वेगवान आणि अधिक मजबूत आहे.

सदर आरोपीविरुद्ध न्यायालयीन प्रक्रियेतील कागदपत्रे, वॉरंट अंमलबजावणी, न्यायालयीन समन्वय तसेच आरोपीचा सातत्याने पाठपुरावा करण्यात बारामती शहर पोलीस स्टेशनच्या महिला रणरागिनी पोलीस हवालदार सगुना आवटे व पोलीस हवालदार उमा कोकरे यांचा देखील अत्यंत मोलाचा सहभाग राहिला असून त्यांच्या मेहनतीमुळे सदर कारवाईस मोठी मदत झाली आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार टापरे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई वैभव मदने, महिला पोलीस हवालदार सगुना आवटे, पोलीस हवालदार उमा कोकरे व बारामती शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने अत्यंत धाडस, चिकाटी, कायदेशीर कौशल्य आणि शिताफीने पार पाडली आहे.

बारामती शहर पोलीसांनी स्पष्ट केले असून, यापुढेही न्यायालयाने नॉन बेलेबल वॉरंट जारी केलेले तसेच गुन्ह्यांमधून फरार असलेले आरोपी यांचा शोध घेऊन अशाच धडाकेबाज, कायदेशीर आणि परिणामकारक कारवाया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment