*“तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर ‘टर्मिन’ इंजेक्शन रॅकेटवर स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांचा मोठा प्रहार ! *१०० इंजेक्शनसह आरोपी जेरबंद; औषध विक्रीच्या बेकायदेशीर नेटवर्कचा तपास सुरू” - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, May 28, 2026

*“तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर ‘टर्मिन’ इंजेक्शन रॅकेटवर स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांचा मोठा प्रहार ! *१०० इंजेक्शनसह आरोपी जेरबंद; औषध विक्रीच्या बेकायदेशीर नेटवर्कचा तपास सुरू”

“तरुणांच्या जीवाशी खेळणाऱ्या बेकायदेशीर ‘टर्मिन’ इंजेक्शन रॅकेटवर स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर  पोलिसांचा मोठा प्रहार ! -*१०० इंजेक्शनसह आरोपी जेरबंद; औषध विक्रीच्या बेकायदेशीर नेटवर्कचा तपास सुरू” 
बारामती :- बारामती शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त धडक कारवाईत शरीरास गंभीर अपायकारक ठरू शकणाऱ्या Schedule-H प्रवर्गातील “टर्मिन” नावाने जनसामान्यांमध्ये ओळखल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा मोठा साठा जप्त करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईमुळे तरुणांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व शरीरसौष्ठवाच्या नावाखाली बेकायदेशीर औषध विक्री करणाऱ्या प्रवृत्तींना मोठा आळा बसणार आहे.

बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. 203/2026 भारतीय न्याय संहिता कलम 123, 125, 278 सह औषध व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940 चे कलम 18(C), 18(A)(VI), 27(D), 28 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

दिनांक 23/05/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण येथील पथकास गोपनीय माहिती प्राप्त झाली की, बारामती शहर हद्दीतील एम.ई.सी.बी. (MECB) कार्यालयाजवळील सर्व्हिस रोड परिसरात एक इसम संशयास्पदरीत्या इंजेक्शनचा साठा घेऊन फिरत आहे. सदर माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी धाड टाकली.

पोलिसांना रोडच्या कडेला अॅक्टीव्हा स्कुटी MH42AW/9260 वर बसलेला एक इसम संशयित अवस्थेत दिसून आला. त्यास ताब्यात घेऊन नाव विचारले असता त्याने त्याचे नाव गौरव बाळासो जाधव, वय 24 वर्षे, रा. पवार बंगला जवळ, आमराई, बारामती असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्याची व त्याच्या ताब्यातील स्कुटीची झडती घेण्यात आली.

झडतीदरम्यान स्कुटीच्या डिकीत एका खाकी बॉक्समध्ये MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP अर्थात “टर्मिन” नावाने ओळखले जाणारे एकूण 100 सिलबंद इंजेक्शन मिळून आले. सदर इंजेक्शन हे “NAPROPHEN” कंपनीचे असून त्यावरील Batch No. 2CX26003, Mfg. Date March-2026 व Exp. Date Feb-2029 असे नमूद आढळून आले.

आरोपीकडे सदर इंजेक्शन खरेदीचे कोणतेही वैध बिल, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा परवाना मिळून आला नाही. प्राथमिक चौकशीत आरोपी सदर इंजेक्शन बॉडी बिल्डिंग, जिममध्ये शरीर क्षमता वाढविणे व शारीरिक ताकद वाढविण्यासाठी प्रती बाटली सुमारे रु. 500 प्रमाणे विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

सदर कारवाईत पंचासमक्ष खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला :-

1) MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP (“टर्मिन”) नावाचे 100 सिलबंद इंजेक्शन किंमत रु. 33,400/-

2) अॅक्टीव्हा स्कुटी MH42AW/9260 किंमत रु. 50,000/-

असा एकूण रु. 83,400/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर इंजेक्शनबाबत औषध निरीक्षक श्री. सचिन बुगड यांनी तपासादरम्यान सांगितले की, MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP हे औषध Schedule-H प्रवर्गात मोडते व डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्याची विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. सदर औषधाचा मूळ वापर हा Low Blood Pressure या आजारासाठी होतो. मात्र त्याचा गैरवापर शरीर क्षमता वाढविणे (To Achieve Better Physical Performance) यासाठी केला जात असल्याचे समोर आले आहे.

तसेच सदर इंजेक्शनचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास Drowsiness, Incoherence, Hallucinations, Convulsions, Slow Heart Rate यांसारखे गंभीर दुष्परिणाम होऊन व्यक्तीच्या जीवितास व आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असेही औषध निरीक्षकांनी स्पष्ट केले.

सदर आरोपीस विधिवत अटक करण्यात आलेली असून त्याच्याकडून इंजेक्शन पुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार, इतर संबंधित आरोपी, जिम नेटवर्क व बेकायदेशीर औषध विक्रीबाबत सखोल तपास सुरू आहे.

सदरची उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद क्षीरसागर तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सदर कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण येथील पोलीस उपनिरीक्षक कारंडे, पोलीस हवालदार स्वप्नील अहिवळे, पोलीस हवालदार अजय घुले, पोलीस हवालदार निलेश शिंदे तसेच बारामती शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण, तत्पर व धाडसी कामगिरी बजावत आरोपीस ताब्यात घेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर इंजेक्शन साठा जप्त करण्यात यश संपादन केले आहे.

बारामती शहर पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही इंजेक्शन, स्टेरॉईड्स अथवा शरीर क्षमता वाढविणारी औषधे वापरू नयेत. अशा प्रकारच्या बेकायदेशीर औषध विक्रीची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा.

 प्रभारी पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन

No comments:

Post a Comment