*घरगुती वीज ग्राहकांनी ‘स्मार्ट सोलर’ योजनेचा लाभ घ्यावा – दिग्विजय ठोंबरे* - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Monday, September 21, 2026

*घरगुती वीज ग्राहकांनी ‘स्मार्ट सोलर’ योजनेचा लाभ घ्यावा – दिग्विजय ठोंबरे*

*घरगुती वीज ग्राहकांनी ‘स्मार्ट सोलर’ योजनेचा लाभ घ्यावा – दिग्विजय ठोंबरे*
बारामती:- घरगुती वीज ग्राहकांमध्ये सौरऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलार (स्मार्ट) योजनेचा’ पात्र ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे सहायक अभियंता दिग्विजय ठोंबरे यांनी केले. साने गुरुजी तरुण मित्र मंडळ, आमराई येथे माहिती व जनसंपर्क विभागामार्फत आयोजित ‘लोकसंवाद’ कार्यक्रमात त्यांनी नागरिकांना योजनेची माहिती दिली.

केंद्र सरकारच्या पीएम सूर्यघर योजनेशी संलग्न असलेल्या या योजनेअंतर्गत पात्र घरगुती ग्राहकांना छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी केंद्रीय आर्थिक सहाय्य मिळते. १ व २ किलोवॅट क्षमतेसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये, तर ३ किलोवॅटपर्यंतच्या अतिरिक्त क्षमतेसाठी प्रति किलोवॅट १८ हजार रुपये केंद्रीय सहाय्य उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांचा सौर प्रकल्प उभारणीवरील आर्थिक भार कमी होण्यास मदत होते.

सौर प्रकल्प उभारल्यानंतर पाच वर्षे त्याच्या देखभालीची जबाबदारी महावितरणमार्फत नियुक्त सेवा पुरवठादाराकडे राहते. पात्र ग्राहकांनी अधिकृत प्रक्रियेद्वारे अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असेही श्री. ठोंबरे यांनी सांगितले. कार्यक्रमास नगरसेवक बिरजू भैया मांढरे आणि गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रथमेश अर्जुन काशीद उपस्थित होते.

०००

No comments:

Post a Comment