पत्रकार ते राज्याध्यक्ष प्रेरणादायी प्रवास : वसंत मुंडे - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Thursday, December 31, 2020

पत्रकार ते राज्याध्यक्ष प्रेरणादायी प्रवास : वसंत मुंडे

पत्रकार ते राज्याध्यक्ष प्रेरणादायी प्रवास : वसंत मुंडे 

 बारामती:- दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ मध्ये मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण प्रकाशित केले. तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन साजरा केला जातो. समाजप्रबोधनाचे सशक्त माध्यम म्हणून वृत्तपत्राची ओळख आहे. या वृत्तपत्रांमध्ये आवश्यक असणारी पत्रकारिता हे जसे शास्त्र आहे तसेच ती एक कलाही आहे. शब्दांच्या माध्यमातून मनाचा अचूक ठाव घेत वाचणाऱ्याच्या मनाला भिडणारे, प्रबोधन, ज्ञान संवर्धन व मनोरंजन करणारे लेखन हे पत्रकारितेचे खरेच गमक आहे. अशा या वृत्तपत्रामधील पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रत्यक्ष पेपर वाटपासून ते आज थेट महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या राज्याध्यक्षपदी आपले नाव कोरत, आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून आपले वेगळेपण जपत, पत्रकार, प्रतिनिधी, वृत्तपत्र वितरक, कर्मचारी, संपादक यांच्या समस्यांना वाचा फोडणारे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणजेच वसंत मुंडे.
       वसंत माधवराव मुंडे यांचा जन्म जानेवारी १९७८मध्ये परळी तालुक्यातील लाडझरी या छोट्याशा खेड्यामध्ये झाला. घरची परिस्थिती हालाखीची. मोलमजुरी करून घर कसेबसे चालवले जात.आईसोबत अर्थार्जनासाठी वसंतजीही मोलमजुरी करत आईला मदत करत. शिवाय यासोबतच शिक्षणही चालू होते.प्राथमिक शिक्षण गावातच जिल्हा परिषदेच्या शाळेत तर माध्यमिक शिक्षण शंकर विद्यालय घाटनांदुर येथे झाले.महाविद्यालयीन शिक्षण अंबाजोगाई येथे श्री. योगेश्वरी महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात  झाले. महाविद्यालयीन काळात ग्रंथालयात उपलब्ध असणाऱ्या विविध वृत्तपत्रांची ओळख वसंतजींना सर्वप्रथम झाली.यातूनच वृत्तपत्र विषयी वेगवेगळी जिज्ञासा,कुतूहल त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले.
       यादरम्यान गावाकडे आई काम करत असलेल्या रोहयो योजनेतील मानधन वाटपाची घटना घडली. या योजनेतील मानधन वाटपामध्ये अधिकाऱ्यांनी घोळ करत मानधन वाटप केल्याचे वसंतजींना समजले. अनेक तक्रारी, अर्ज, विनंत्या केल्या मात्र यश आले नाही. शेवटी या सर्व वृत्ताचे रीतसर निवेदन तयार करून त्यांचे महाविद्यालयीन प्राध्यापक तथा तत्कालिन लोकमत वृत्तपत्रांमध्ये कार्यरत असणारे प्रा. भालचंद्र मोटेगावकर यांच्याकडे जाऊन सर्व हकीकत सांगितली. त्यांनी लगेच या घटनेची शहानिशा करून योग्य तो न्याय देत योग्य मानधन वाटप करण्यास भाग पाडले. स्वतः उभारलेल्या या पहिल्या न्याय लढ्यास वसंतजींना मिळालेले हे पहिले यश होते.
      पुढे अंबाजोगाई येथील उर्दू पत्रकार मुस्ताक हुसैन यांच्यासोबत अंबानगरीमध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकार मंडळींसोबत एकत्रित येऊन विविध विषयावर व विविध पत्रकारांची ओळख वाढत गेली. यातूनच प्रा. गाठाळ यांच्या विवेकसिंधु या वृत्तपत्रांमध्ये कार्यरत असणारे पत्रकार विजय हमिने यांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी महाविद्यालयातील विविध घटनांची वृत्तपत्रांमधून बातमी स्वरूपात रूपरेषा देण्यास सुरुवात केली.
      याचकाळात अंबाजोगाई नगरपरिषद निवडणुका सुरू झाल्या. सा. जन्मभूमीचे संपादक मोहन कराड त्यावेळी निवडणुकीसाठी उभे राहिले. त्यावेळी या साप्ताहिकांचे वाटप देखील वसंतजी यांनी केले. विविध वृत्तपत्रांमध्ये आपण लेखन करावे, ते प्रसिद्ध व्हावे यासाठी मिळेल ते काम, सर्व कष्ट, प्रचंड मेहनत करण्याची त्यांची तयारी होती. अशातच एकदा त्यांच्या गावातील शेतामध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये त्यांची व इतर गावकऱ्यांच्या शेतातील पिके जळाली. या घटनेचे सविस्तर वृत्त ज्येष्ठ पत्रकार अमर काका हबीब यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतजी यांनी तयार करून ते दै. विवेकसिंधू मधून प्रसिद्ध झाले. ही वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली त्यांची पहिलीच बातमी होती. मात्र या बातमीची दखल घेत शेतातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे होऊन आर्थिक मदतही मिळाली.
       अंबाजोगाई येथील तत्कालीन पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते अरुण खैरमोडे यांच्या सहवासामुळे वसंतजी यांना  दै. मराठवाडा साथी प्रतिनिधी सर्वप्रथम वृत्तपत्र क्षेत्रात संधी मिळाली. वृत्तपत्र क्षेत्रात त्यांनी आपले काम सुरु केले. याच काळात त्यांचा संपर्क शिक्षक संघटनेमध्ये कार्यरत असणारे संपत्ते गुरुजी यांच्याशी आला.त्यांच्यासोबत त्यांनी मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती करत शालेय शिक्षण, शैक्षणिक विचारधारा, शैक्षणिक समस्या अशा विविध गोष्टींची माहिती घेत आपली ज्ञानवृद्धी केली. पत्रकारिता क्षेत्रातील काम करत असताना नवीन नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी ते सतत धडपडत असत. याच दरम्यान श्री योगेश्वरी महाविद्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या भगवानराव सबनीस यांच्याकडे त्याकाळी लोकसत्ता, सकाळ हे पेपर पोस्टाने येत असत.मग वसंतजीनी हे वृत्तपत्र पाहून,वाचून त्यामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या, स्तंभलेखन, स्टोरी लेखन यांचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले. त्यानुसार लिहिण्याचा प्रयत्न केला. यासोबतच ज्येष्ठ पत्रकार अमर काका हबीब, सुदर्शन रापतवार, विजय हमिने यांच्या सहवासात त्यांना अनेक गोष्टी शिकण्यास मिळाल्या.
       याच दरम्यान त्यांच्या जीवनात एक अशी घटना घडली, जी त्यांच्या जीवनात, पत्रकारिता क्षेत्रात एक टर्निंग पॉइंट ठरली. अंबाजोगाई जिल्हा निर्मितीचे आंदोलन सुरू झाले होते. पत्रकार व विद्यार्थी आघाडी यांच्या माध्यमातून वसंतजी ह्या लढ्यात सहभागी झाले होते. मात्र बर्दापूर येथे पोलिस स्टेशनमधील पत्त्याच्या क्लबची बातमी वसंतजी यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध केली. यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यात पोलीस प्रशासन हादरून गेले. तत्कालीन अधिकाऱ्यावर कारवाई झाली.मात्र काहीच दिवसात जिल्हा निर्मितीचे आंदोलन चिघळले आणि अंबाजोगाई येथे कर्फ्यू लागला. या कर्फ्यूमध्ये वसंतजी अंबाजोगाई येथील बस स्टँड वर अडकले, ड्युटीवर असणारे अधिकारी यांच्या लक्षात ही गोष्ट आल्याने मागील बातमीचा राग मनात धरत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह वसंतजी यांना रस्त्यावरच अमानुषपणे मारहाण केली. ही मारहाण इतकी अमानुष होती की त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानसभेत उमटले. महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांनी या घटनेची लक्षवेधी आयोजित करून विधानसभा तहकूब केली. पुढे मुंडे साहेबांनी या घटनेबद्दल वसंतजी यांची आस्तेवाईकपणे चौकशी करत पाठीवर कौतुकाची थापही दिली.
   सन १९९९ च्या अखेरीस त्यांना दै. लोकपत्रमध्ये जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती मिळाली.२००० ते २००१ या काळात त्यांनी आजपर्यंत प्राप्त केलेल्या अनुभवाचा उपयोग करून आपले वेगळेपण सिद्ध केले. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या व्यथा समजून घेण्यासाठी त्यांनी दहा दिवस ऊसतोड कामगारांसोबत राहून प्रत्यक्ष अनुभवावर आधारित ऊसतोड कामगारांच्या व्यथा चित्रित करणारी क्रमिक लेखमालिका लोकपत्रातून प्रसिद्ध केली.या पहिल्याच लेखमालिकेस "समर्थन संस्था मुंबई" द्वारे राज्यातील पत्रकारांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती प्राप्त झाली. सन २००२ मध्ये या शिष्यवृत्तीच्या वितरण समारंभ प्रसंगी मराठवाड्यातील पत्रकार म्हणून ऐनवेळेस व्यक्त केलेल्या मनोगताने सर्वांचे लक्ष वेधले. याप्रसंगी मंचावर उपस्थित असणारे लोकसत्ताचे तत्कालीन सहायक संपादक श्री. दिनकर रायकर यांनी वसंतजींची विशेष दखल घेत पाठीवर कौतुकाची थाप ही दिली.
     दिवसेंदिवस वसंतजींचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रगतीचा आलेख हा चढताच होता. पुढे दै. लोकसत्ताचे तत्कालीन सहाय्यक संपादक श्री दिनकर रायकर, आनंद आगाशे, मुकुंद संगोराम या पत्रकारितेतील दिग्गज व्यक्तींनी त्यांची दै. लोकसत्ताचे बीड जिल्हा प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली. सन २००२ मध्ये त्यांची पहिली बातमी "पीक पाणी"या सदरामध्ये दै. लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाली. दैनिक लोकसत्ता वृत्तपत्राच्या माध्यमातून आजवर वसंतजी यांनी अनेक विविधांगी लेखन केलेले आहे. यामध्ये "सक्सेस स्टोरी, चर्चेतले चेहरे, कृषीधन या विषयावर आधारित लेखमालिका विशेष गाजल्या.
     सन २००४ मध्ये बीड जिल्हा पत्रकार संघाच्या सचिव पदी वसंतजी यांची तर अध्यक्ष म्हणून संतोष मानूरकर यांची निवड करण्यात आली. याच्या माध्यमातून त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. ज्येष्ठ पत्रकार स.मा. गर्गे पत्रकारिता पुरस्काराचे आयोजन दरवर्षी केले. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. विलासरावजी देशमुख व  लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या हजरजबाबी, वक्तृत्वसंपन्न, भाषाचातुर्य व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीत आयोजित होणारा कार्यक्रम म्हणजे बीडकरांसाठी अवर्णनीय असा होता.आजतागायत दरवर्षी हा पुरस्कार अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रदान केला जातो.
     सन २०१४ -१५ पासून महाराष्ट्र राज्य शासनाच्या अधिस्वीकृती कमिटीवर त्यांची नियुक्ती झालेली आहे. तसेच मराठवाडा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर खुली चर्चा, ज्येष्ठ पत्रकारांची अर्ज न घेता  निवड, कोटा पद्धतीमध्ये बदल अशा विविध विषयांमध्ये अमुलाग्र बदल करत आपल्या कार्याची वेगळी छाप त्यांनी पाडली. त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोकरे तसेच गोविंद घोळवे यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या कार्याध्यक्षपदी तर सन २००० पासून राज्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणत्याही वृत्तपत्राचे संपादक नसतानाही एक जिल्हा प्रतिनिधीपदी काम करणारा पत्रकार असूनही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्षपद भूषविणारे वसंत मुंडे हे पहिले पत्रकार आहेत. हा वसंत मुंडे यांच्यासोबतच आपल्या बीड जिल्ह्याचा बहुमान आहे.
      महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष या नात्याने त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात अमुलाग्र बदल केलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील वृत्तपत्र क्षेत्राशी निगडित व्यक्तींच्या ऑनलाईन बैठकांचे संवादांचे त्यांनी आयोजन केले. कोरोना सारख्या भयानक काळात पत्रकार,वृत्तपत्र वितरक, विक्रेते, कामगार यांचे अतोनात हाल झाले. समाजातील अधिकारी-कर्मचारी यांच्या पगार कपातीचे विस्ताराने चर्चा अनेक वृत्तपत्रांमध्ये करण्यात आले.मात्र याच वृत्तपत्रासाठी कार्यरत असणारे अनेक छोटे-मोठे पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, वितरक, कर्मचारी यांच्या पगार कपातीची दखल मात्र कुठल्याच वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाली नाही हे विलक्षण दुर्दैवच म्हणावे लागेल. अशा सर्व पत्रकार बांधवांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी एक राज्याध्यक्ष या नात्याने आपल्या संघटनेच्या माध्यमातून एक कुटुंबप्रमुख या नात्याने तीस हजारांहून अधिक बांधवांना सर्वतोपरी सहकार्य त्यांनी केले.
    आजच्या आधुनिक काळात जीवनातील प्रत्येक गोष्ट ही महाग होत चाललेली आहे. एक रुपयाला मिळणारा चहा दहा रुपयाला मिळतो, एक झेरॉक्स दोन रुपयाला येते. मात्र आठ ते दहा पानी वृत्तपत्र केवळ तीन ते चार रुपयाला तेही अनादिकाळापासून! या भूमिकेला एक राज्याध्यक्ष म्हणून न्याय देण्यासाठी वृत्तपत्रांची किंमत वाढवली पाहिजे ही भूमिका सर्वप्रथम त्यांनी मांडली.देशाच्या बजेटवर विस्ताराने वर्णन करणारी वृत्तपत्रे मात्र वृत्तपत्राच्या बजेटवर विस्ताराने चर्चा करत नाहीत. संपादकांनी पत्रकारांना जाहिरातदाराच्या दारातून बाहेर काढायचे असेल तर वर्तमानपत्राची विक्री किंमत वाढवावी लागेल. तर आणि  तरच जाहिरातदार संपादकाच्या दारात येईल. ही ठाम भूमिका महाराष्ट्रात सर्वप्रथम वसंत मुंडे यांनी मांडली.याचा परिणाम म्हणून आज महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांनी आपली किंमत वाढवण्यास सुरुवात केलेली आहे. वृत्तपत्राच्या किमती वाढल्यामुळे वृत्तपत्राला आर्थिक स्थैर्य लाभेल आणि त्यातूनच वृत्तपत्राचा दर्जा सुधारेल असे त्यांचे ठाम मत आहे. त्यांच्या  या भूमिकेचे विस्ताराने वर्णन करणारी मुलाखत महाराष्ट्रातील विविध २०० हून अधिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली हे विशेष.वृत्तपत्र क्षेत्रातील होणाऱ्या या परिवर्तनाची नांदी वसंतजी मुंडे यांच्यामुळेच महाराष्ट्रात सर्वप्रथम सुरुवात झाली. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या निर्णयामुळेच वसंत मुंडे व बीड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात सर्वश्रुत झालेले आहे. ज्यायोगे आगामी काळात वृत्तपत्र क्षेत्रात अनेक सकारात्मक बदल आपणास निश्चितच पहावयास मिळतील.
      राज्यातील वृत्तपत्रांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी वृत्तपत्र संपादकांची पहिली गोलमेज परिषद वसंतजी यांनी आयोजित केली. या परिषदेसाठी नगर, जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील ४० हून अधिक संपादक या परिषदेसाठी उपस्थित होते. पत्रकारितेच्या क्षेत्रातील २० वर्षाच्या समृद्ध अनुभवातून वृत्तपत्र,पत्रकार, प्रतिनिधी, कर्मचारी, विक्रेते, वितरक या सर्वांच्या हितासाठी त्यांना अनेक नवनवीन योजनांची अंमलबजावणी करावयाची आहे.
   कुठलीही शैक्षणिक,आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी पाठीशी नसताना, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर वसंतजी यांनी वृत्तपत्र वाटप ते राज्याध्यक्षपदी कार्य करत आपले कौशल्य, वेगळेपण सिद्ध केलेले आहे. त्यांचा हा प्रवास नक्कीच सर्वांना थक्क करणारा आणि प्रेरणादायी आहे. राज्याध्यक्ष वसंतजी मुंडे आपल्या कार्यातून वृत्तपत्र क्षेत्रास नवसंजीवनी देण्यास नक्कीच यशस्वी ठरतील.यासाठी सा. प्रभाकर परिवाराच्या वतीने त्यांना  हार्दिक शुभेच्छा.
विश्ववासराव आरोटे 
राज्य सरचिटणीस 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई

No comments:

Post a Comment