१ जानेवारी २०२४ Aeonplay चे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे वाढदिवस विशेष.नव्या परंपरांचे निर्माते..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, December 31, 2023

१ जानेवारी २०२४ Aeonplay चे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे वाढदिवस विशेष.नव्या परंपरांचे निर्माते..!

१ जानेवारी २०२४ Aeonplay चे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे वाढदिवस विशेष.नव्या परंपरांचे निर्माते..!
बीड:- भारतात पहिल्यांदाच बीएसएनएलच्या सहकार्याने एऑन प्लेच्या प्लॅटफॉर्मवर माहिती आणि मनोरंजनाचा खजाना बरोबरच सर्व भाषेतील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, डिजीटल मिडीया एका क्लिकवर आणण्याचा प्रयोग यशस्वी करून तरूणांसाठी नव्या डिजीटल रोजगाराचे दालन खुले केले. तर महाराष्ट्रासह तीन राज्यात पंचवीस हजारापेक्षा जास्त सदस्य संख्या असलेल्या संघटनेला विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक चेहरा दिला. पारंपारिक आर्थिक धोरण बदलून वृत्तपत्रांनी उत्पादन खर्चावर आधारीत विक्री किंमत ठेवावी आणि केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्‍यांना उत्पन्न करात वार्षिक पाच हजार रूपयाची सूट द्यावी यासाठी राज्यात जनजागृती करत पत्रकारांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लढा उभारला. याची दखल घेवून एबीपी माझा वृत्तवाहिनीने महाराष्ट्राचे अनमोल रत्न या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान केला आहे. तर लोकमत मिडीया ग्रुपने आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम अवार्ड दुबई येथे प्रदान करून दोन्ही माध्यम समुहांनी वसंत मुंडे यांचा कार्याचा गौरव केला.
परळी वैजनाथ तालुक्यातील लाडझरी येथुन शिक्षणासाठी अंबाजोगाईत आलेल्या वसंत मुंडे यांनी शालेय जीवनातच रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुरांना एका पत्रकाराच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला. महाविद्यालयात असतानाच विभागीय वृत्तपत्रात काम करण्याची संधी मिळाली. तेव्हा  ऊसतोड मजुरांबरोबर जावून त्यांच्या समस्यांवर प्रदिर्घ लेखमाला लिहिली आणि चळवळीतील कार्यकर्त्यांचे  लक्ष वेधले घेतले. याच मालिकेवर त्यांना समर्थन संस्थेने शिष्यवृत्तीही जाहिर केली.
मुंडे यांना कमी वयातच राज्यस्तरावरील दैनिकात  संधी मिळाली आणि त्यांच्या लेखणीचा दबदबा राज्यभर निर्माण झाला. बीड जिल्ह्यातील राजकारण, समाजकारणाचे वेगळेपण नेमकेपणाने हेरून मुंडे यांनी सातत्याने मांडले. चांगल्या विषय भरभरून लिहिले. दुष्काळ व नापीकी मुळे  काही वर्षांपूर्वीपासून शेतकरी आत्महत्यांचा विषय चर्चेत असतो. मात्र काही शेतकरी मात्र हतबल न होता परिस्थितीला हारवून उपलब्ध  साधनांमधून नवीन  प्रयोग यशस्वी करता.अशा शेतकर्‍यांच्या यशोगाथा मांडल्या, आणि शब्द शिवार पुस्तक शब्दबध्द केल. यातुन परिस्थितीत झगडणार्‍या शेतकर्‍यांना प्रेरणा मिळावी,समाजातील नकारात्मक भावना कमी व्हावी त्यामागचा उद्देश.
पुस्तकाच्या प्रस्तावनेतच वसंत मुंडे यांच्या लेखणीचे कौतुक करताना हिवरे बाजारचे सरपंच, सामाजिक कार्यकर्ते, पद्मश्री श्री.पोपटराव पवार लिहितात - ‘अनेक नवनवीन प्रयोगांची दखल श्री.वसंत मुंडे ह्यांनी घेतली आहे. नवीन तंत्रज्ञान आपण स्वीकारावं, असं शेतकर्‍यांना वाटू लागल्याचं चांगलं चित्र त्यांनी मांडलं आहे. हे बदल टिपणं, असे प्रयोग करणार्‍यांना प्रोत्साहन देणं, ही आश्‍वासक पत्रकारिता म्हणता येईल.’
समाजाचे प्रश्‍न मांडणार्‍या पत्रकारांच्या अडचणींचे काय? यावर कोणी बोलण्यास तयार नसते. वृत्तपत्रांचे व्यवस्थापन आणि कर्मचारी कोणत्या परिस्थितीला तोंडे देऊन काम करतात, पत्रकारांना मिळणारा मान सन्मान त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण शकतो का? माध्यमांची वाढत्या संख्येमुळे या क्षेत्रात काम करणार्‍या घटकांचे काही प्रश्‍न आहेत ही जाणीवच कोणी करून घेत नाही. हे लक्षात घेवून आपले प्रश्‍न आपण मांडायला हवेत या भूमिकेतून वसंत मुंडे यांनी संघटनेच्या व्यासपीठावरुन वृत्तपत्र आणि पत्रकारांचे प्रश्‍न मांडायला सुरूवात केली. सामान्यांचे प्रश्‍न मांडणार्‍या माध्यमांचे उघडपणे पहिल्यांदाच प्रश्‍न मांडले जावू लागल्याने वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर पत्रकारांचे मजबूत संघटन उभा राहिले. महाराष्ट्रासह तीन राज्यात संघटनेचे पंचवीस हजाराहून अधिक सभासद निर्माण झाले. आपले प्रश्‍न कोणीतरी पोडतिडकीने मांडतो आहे हे लक्षात घेवून वृत्तपत्र व इतर माध्यमातील ज्येष्टांनीही मुंडेंच्या नेतृत्वाला पाठबळ दिले. संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा स्विकारल्यानंतर मुंडेंनी राज्यभरात वृत्तपत्राचे अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्या यावर स्वतंत्र सहा विभागीय अधिवेशने घेवून जनजागृती केली. माध्यमात काम करणार्‍यांना आर्थिक पातळीवर सक्षम आणि उचित सन्मान मिळाला पाहिजे. वृत्तपत्रांनी पारंपारिक आर्थिक धोरण बदलून उत्पादन खर्चावर आधारीत वृत्तपत्राची विक्री किंमत ठरवावी असा आग्रह धरला. परिणामी राज्यभरातील चारशेपेक्षा अधिक वृत्तपत्रांनी आपल्या किमती दुप्पट करण्याचा निर्णय घेतला. तर सरकारने कर्मचार्‍यांना पाच दिवसाचा आठवडा करून दोन सुट्ट्या दिल्या आहेत. वृत्तपत्र मात्र वर्षातून केवळ पाच ते सहाच वेळा सुट्या घेतात.कर्मचार्‍यांचीही हिच परिस्थिती. सद्यस्थितीत माहितीची अनेक माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे वृत्तपत्रांनीही आता आठवड्याला एक सुट्टी घेण्याची कल्पना मांडून यातील आर्थिक गणित आणि होणारा फायदाही मांडला. याचे काही वृत्तपत्रांनी स्वागत केले. तर वृत्तपत्र खरेदी करणार्‍यांना केंद्र सरकारने आयकरात वार्षिक पाच हजार रूपयाची सुट द्यावी असा प्रस्तावही त्यांनी दिला आहे. राज्य सरकारने राज्यातील ग्रामपंचायतींना वार्षिक आराखड्यात वृत्तपत्र खरेदीसाठी दहा हजार रूपयाची तरतूद करावी ही मागणीही त्यांनी लावून धरली आहे. वृत्तपत्र क्षेत्राला आर्थिक पातळीवर आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांचा प्रयत्न देशपातळीवर चर्चेत आहे. कोरोनाच्या काळात पत्रकारांसाठी राज्यभर मदत कक्ष सुरू करून काही कोटी रूपयांच्या जमा केलेल्या जिवनावश्यक वस्तू गरजुंपर्यंत पोहोचविण्याचे काम केले.संघटनेच्या रूग्णवाहिका प्रशासनाकडे दिल्या. रक्तदान शिबीरे घेवून एका दिवसात 1600 पिशव्या रक्त संकलीत केले. नैसर्गिक आपत्तीत लोकसहभागातून आपदग्रस्तांना मदत उभा केली. विविध सामाजिक उपक्रम राबवून संघटनेला सामाजिक चेहरा दिला आहे.  शासनाच्या अधिस्विकृती पत्रिका समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना वसंत मुंडे यांनी हे पद मिरवण्यासाठी नाही तर पत्रकारांना न्याय देण्यासाठी आहे हे कामातून दाखवून दिले. विभागातल्या सर्व जिल्ह्यामध्ये पत्रकारांबरोबर खुली चर्चा घेतली आणि अधिस्विकृती पत्रिका मिळण्यासाठीच्या अडचणीही समजून घेत कोटा पध्दत बंद करून तालुका पातळीवरील पत्रकारांना अधिस्विकृती देण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ट पत्रकारांना त्यांच्या घरी जावून अधिस्विकृती पत्रिका देण्याचा निर्णय राज्यभर नावाजला गेला. मुद्रीत माध्यमात काम करताना बदलत्या काळानुसार डिजीटल क्रांतीमुळे या क्षेत्रात आता प्रयोग केला पाहिजे हे लक्षात घेवून मुंडे यांनी मागील तीन वर्षाच्या अथक परिश्रमातून भारतात पहिल्यांदाच बीएसएनएलच्या सहकार्याने एऑन प्लेच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्व भाषेतील वृत्तपत्रे, टीव्ही चॅनेल्स, डिजीटल मिडीया एका क्लिकवर आणला आहे. माहिती आणि मनोरंजनाबरोबरच या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तरूणांना डिजीटल रोजगाराची नवी संधीही उपलब्ध केली आहे. डिजिटल बाजारपेठ अनेक नवीन संधी निर्माण करत असल्याने या क्षेत्रात ही वसंत मुंडे यांनी नवा प्रयोग करून आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली आहे.
राज्यव्यापी पत्रकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, गावपातळीपासून शहरापर्यंत संघटनेचे व्यापक जाळे निर्माण करताना राज्यभर त्यांनी अनेक संस्था आणि माणसे जोडली, उभी केली त्यामुळे त्यांचा राज्यभर मोठा चाहता वर्ग आहे. लोकशाहीतील प्रमुख घटक असलेल्या वृत्तपत्रांचे अर्थकारण आणि त्याला बळकटी आणण्यासाठी त्यांनी केलेला प्रयत्न, बदलत्या काळानुसार डिजीटल क्रांतीत ‘एऑन प्ले’ची निर्मिती, या त्यांच्या सततच्या कामाकडे माध्यमांचे आणि सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेतले नाही तर नवलच! वृत्तपत्रात शक्यतो इतर संस्थेमधील व्यक्तीचा कामाचा गौरव करण्याची परंपरा नाही. मात्र लोकमता मिडीया ग्रुपने आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘एक्सलन्स इन सोशल जर्नालिझम’ अवार्ड देऊन दुबईत वसंत मुंडेंचा सन्मान केला. तर महाराष्ट्रातील आघाडीची ‘एबीपी माझा वृत्तवाहिनी’ने यावर्षी मानाच्या ‘महाराष्ट्राचे अनमोल रत्न’ या पुरस्कारासाठी निवड झाली. या दोन्ही नामांकीत माध्यमसमूहांनी पुरस्काराच्या माध्यमातून श्री.वसंत मुंडेंच्या कार्याचा गौरव केला आहे.
पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत श्री.वसंत मुंडे यांनी आपल्या व्यवसायाला आणि व्यवसायातील सहकार्‍यांना आत्मनिर्भर करण्यासाठी उभा केलेला लढा आणि निडरपणे सामान्यांचे प्रश्‍न मांडताना घेतलेली भूमिकेने विश्‍वासार्हता निर्माण केली आहे. अशा या लढवय्या पत्रकार कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक सदिच्छा!
प्रा.डाॅ. प्रभू गोरे,
संपादक, छत्रपती संभाजीनगर.

No comments:

Post a Comment