पत्रकार संघाची मागणी इतर राज्यातील पत्रकारही लावून धरतील अमर उजालाचे निवासी संपादक विजयकुमार गुप्ता यांचे मत..
बीड (प्रतिनिधी):- केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्यांना आयकरात वार्षिक पाच हजार रूपयाची सुट द्यावी ही मागणी देशभरातील वृत्तपत्रांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करणारी आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारे मागणी झाली असून ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी लोकसभा निवडणूकीतील उमेदवारांना निवेदन दिल्याने याकडे लक्ष वेधले आहे. त्यामुळे दिल्लीसह इतर राज्यातील वृत्तपत्र आणि पत्रकार संघटनाही ही मागणी लावून धरतील त्यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही राष्ट्रीय दैनिक अमर उजालाचे निवासी संपादक विजयकुमार गुप्ता यांनी दिली.
बीड लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचे वार्तांकन करण्यासाठी राष्ट्रीय दैनिक अमर उजालाचे निवासी संपादक विजयकुमार गुप्ता आले होते. त्यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांची भेट घेवून पत्रकार संघाने उमेदवारांकडे केलेल्या मागणींबाबत चर्चा केली. कोरोनानंतर अडचणीत आलेल्या वृत्तपत्रांना केंद्र सरकारने मदत करावी यासाठी पत्रकार संघाने अर्थमंत्र्यांकडे वृत्तपत्र खरेदी करणार्यांना वार्षिक पाच हजार रूपयाची सुट द्यावी अशी मागणी केली आहे. त्यासाठी लोकसभा निवडणूकीतील सर्व पक्षीय शंभर उमेदवारांना या मागणीला पाठींबा मिळावा आणि संसदेत पाठपुरावा व्हावा यासाठी निवेदन देण्याची मोहिम चालवली आहे. देशात पहिल्यांदाच अशा पध्दतीने वृत्तपत्रांसाठी मागणी झाली असून मागणी पुर्णत्वाकडे जावी यासाठी निवडणूकीच्या मैदानातील उमेदवारांना निवेदन देवून पाठींबा मिळवण्याचा प्रकारही पहिल्यांदाच आपण ऐकतो आहे. पत्रकार संघाचे हे काम वृत्तपत्रांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. त्यामुळे दिल्ली आणि उत्तर भारतातील वृत्तपत्र आणि पत्रकार संघटनाही या मागणीला पाठींबा देतील यासाठी आपण प्रयत्न करू अशी ग्वाही त्यांनी दिली. लवकरच दिल्ली येथे या मागणीबाबत संघटनांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे यावेळी वसंत मुंडे यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment