विद्या प्रतिष्ठानचे न्यू बाल विकास मंदिर येथे पासिंग आऊट परेड जल्लोषात संपन्न..
बारामती:- विद्या प्रतिष्ठानचे न्यू बाल विकास मंदिर पिंपळी बारामती या शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांची पासिंग आऊट परेड बुधवार दि.२९ जानेवारी २०२५ रोजी जल्लोषात संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल नांबियार आर.एम.आर. उपस्थित होते.
विद्यालयाच्या वाद्यवृंद पथकाच्या गजरात मान्यवरांचे आगमन झाले, तसेच व्यासपीठावर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करुन त्यांना स्कूल कॅप्टनने वाद्यवृंद पथकासह मानवंदना दिली. विद्यार्थ्यांनी “दया कर दान” ही प्रार्थना म्हणून वातावरण मंगलमय केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी संचलन पथकाची पाहणी केली. विद्यालयाच्या प्राथमिक विभाग प्रमुख सौ. माधुरी दीक्षित यांनी कर्नल नांबियार आर.एम.आर. यांचा परिचय करून दिला, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या सौ. तनुश्री गोरे मॅडम यांनी केले. त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने विविध पथकांचे नयनरम्य संचलन झाले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मेडल देऊन प्रोत्साहित केले.
सदर कार्यक्रमात श्री.संतोष देवकाते, श्री.अमोल पवार व सौ.शितल गायकवाड या पालकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व शैक्षणिक सुविधा देणारी संस्था व शाळा, अभ्यासक्रमासोबतच सामाजिक जाणिवांचा संस्कार करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कर्नल नांबियार आर.एम.आर यांनी स्वानुभवाचे मजेशीर कथन करुन “मुलगा-मुलगी असा भेद न करता सर्वच क्षेत्रातील समान संधींचा लाभ घ्यावा. संकटे व अडथळे येतच असतात त्यातून ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिले पाहिजे. शिक्षक आयुष्यभरासाठीचे गुरू असतात. त्यांचा आदर करा.” असा बहुमोल संदेश देऊन पालकांनी मुलांवर दबाव न टाकता, स्वभावात असलेल्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित करावे. असा सल्ला दिला.
त्यानंतर मान्यवरांना स्मृतिचिन्ह व विद्यार्थ्यांनी तयार केलेले पेंटिंग भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
विद्यालयचे गीत गायन झाल्यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांनी संचलन पथकातून गहिवरलेल्या भावनेने निरोप घेतला. स्कूल कॅप्टन स्वराज दळवी आणि अक्षरा पवार यांनी कॅप्टन पदाची सूत्रे वाईस कॅप्टन सर्वेश शिंदे आणि मनकर्णिका चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका सौ. कविता मदने यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माध्यमिक विभाग प्रमुख सौ. लीला शेट्टी मॅडम, विद्यालयाच्या प्राचार्या सौ तनुश्री गोरे मॅडम यांचे मार्गदर्शन व सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment