लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पडताळणीचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न देण्याबाबत दिले निवेदन...
बारामती:-अंगणवाडी कर्मचारी संघटना (महाराष्ट्र)च्या वतीने बारामतीत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या पडताळणीचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न देण्याबाबत पंचायत समिती प्रकल्प अधिकारी यांना निवेदन देण्यात आले, महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवणे, त्यांचा अर्ज भरून त्याची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करणे यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे किती योगदान आहे हे आपण जाणताच. परंतु
त्याचा मान्य केलेला मोबदला देण्यात मात्र शासन टाळाटाळ करत आहे असा सर्वांना अनुभव येत आहे.महिला व बालविकास विभागामार्फत जुलै 2024 मध्ये "लाडकी बहिण" ही महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली. या योजनेत लाभार्थ्यांचे अर्ज ऑनलाइन भरले जाण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर देण्यात
आली होती. त्या प्रक्रियेत अनेक ठिकाणी अंगणवाडी मदतनीस यांनीही सक्रियपणे सहभाग घेतला.सरकारने यापूर्वी जाहीर केले होते की प्रत्येक भरलेल्या अर्जासाठी ५० रुपये मानधन देण्यात येईल. हे मानधन बऱ्याच अंगणवाडी सेविकांना मिळाले आहे, परंतु अनेक जिल्ह्यांमध्ये एकचर हा मोबदला अपुरा मिळालेला
आहे आणि ग्रामीण प्रकल्पांमध्ये तर मिळालेलाच नाही. उदाहरणार्थ, नाशिक, पुणे जिल्हा ग्रामीण प्रकल्प.काम केल्याचा मोबदला मिळावा म्हणून बराच प्रयत्न करून देखील आधी केलेल्या कामाचा मोबदला मिळालेला नाही. त्यातच आता या सर्व लाभार्थी महिलांची पडताळणी करून अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचे काम अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून करवून घेतले जाणार आहे. अर्ज भरताना सरसकट अर्ज भरून घेतले व नंतर
त्याची पडताळणी झाली. अजूनही पुन्हा दुसऱ्यांदा ही पडताळणी सुरु आहे असे समजते. अंगणवाडी कर्मचारी स्थानिक आहेत व त्यांना आयसीडीएस योजनेतील विविध सेवा देण्यासाठी सतत घरोघर जावे लागते. त्यांनी ही पडताळणी करून काही महिलांची नावे वगळण्यात आल्यास त्यांच्या संतापाला त्या बळी पडण्याची व
त्यामुळे त्यांच्या अंगणवाडीच्या नियमित कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे तरी हे पडताळणीचे काम त्यांना देऊ नये. हे काम करण्याची अंगणवाडी कर्मचाऱ्यांऐवजी दुसरी कोणतीही यंत्रणा राबवावी व सेविका,
मदतनिसांचा जीव धोक्यात घालू नये ही विनंती. अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी लाडक्या बहिणींची पडताळणी करण्यास सर्व संघटनांचा विरोध आहे याची कृपया नोंद घ्यावी.अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र पुणे जिल्हा व बारामती च्या वतीने करण्यात आली.
No comments:
Post a Comment