“कोणी मध्ये येऊ नका, नाहीतर बघून घेऊ”; म्हणत हल्ला करणारे दोन आरोपी अटक करून जखमींचा जीव वाचविला कर्तव्यदक्ष पोलिसांनी.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Sunday, February 22, 2026

“कोणी मध्ये येऊ नका, नाहीतर बघून घेऊ”; म्हणत हल्ला करणारे दोन आरोपी अटक करून जखमींचा जीव वाचविला कर्तव्यदक्ष पोलिसांनी..

“कोणी मध्ये येऊ नका, नाहीतर बघून घेऊ”; म्हणत हल्ला करणारे दोन आरोपी अटक करून जखमींचा जीव वाचविला कर्तव्यदक्ष पोलिसांनी.. 
बारामती:- बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 73/2026, भा.न्या.स. कलम 109, 61(2), 118(2), 351(2), 351(3), 3(5) अन्वये फिर्यादी महेंद्र धोंडिबा गायकवाड, वय 53 वर्षे, व्यवसाय – स्वप्नील हॉटेल, रा. खांडज, 22 फाटा, ता. बारामती, जि. पुणे यांच्या फिर्यादीवरून गंभीर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

दिनांक 22/02/2026 रोजी दुपारी मोरगाव रोडवरील ग्लोबल हॉटेल समोर, प्रणव डिजीटल दुकानाजवळील मैदानात, दिनांक 21/02/2026 रोजी रात्री हॉटेलच्या बिलावरून झालेल्या वादाचा राग मनात धरून, अक्षय जगताप व त्याच्या सोबत्यांनी फिर्यादीवर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांड्याच्या कु-हाडीने व लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला करून उजव्या पायावर व छातीत गंभीर दुखापती केल्या.

हल्ल्यावेळी एका साथीदाराने आसपासच्या नागरिकांना “कोणी मध्ये येऊ नका, नाहीतर बघून घेऊ” अशी धमकी देऊन धाकदपटशा केल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमी व्यक्तीस वेळ न दवडता उपलब्ध वाहनाद्वारे मेडिकल कॉलेज, बारामती येथे दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले. 

डॉक्टरांच्या त्वरित उपचारांमुळे व पोलीस दलाच्या जलद निर्णयक्षमतेमुळे जखमीचा जीव वाचला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा सदैव जागरूक व कटिबद्ध असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

या गंभीर गुन्ह्यानंतर बारामती शहर पोलीसांनी अल्पावधीतच तपासाची चक्रे वेगाने फिरवून गुन्ह्यातील संशयित आरोपी 1) विक्रम जगताप, रा. खांडज, ता. बारामती, जि. पुणे व 2) जयदीप भागवत भोसले, रा. पाहुणेवाडी, ता. बारामती, जि. पुणे यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात भा.न्या.स. कलम 109 सह इतर कलमांनुसार कठोर कारवाई सुरू आहे. 

मुख्य आरोपी अक्षय सुनिल जगताप (रा. माळेगाव कारखाना, ता. बारामती) व त्याचा साथीदार महादेव उर्फ भाऊ सुरेश जाधव (रा. ढवळेमळा) हे सध्या फरार असून, त्यांना अटक करण्यासाठी विशेष तपास पथक नेमून तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे त्यांचा शोध तीव्र करण्यात आला आहे.

सदर आरोपींना शोधून काढणे व ताब्यात आणण्याकरिता तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्री सतीश राऊत, पोलीस हवालदार श्री सुलतान डांगे, पोलीस हवालदार अमोल शिंदे, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई वैभव मदने, पोलीस शिपाई राहुल बडे व पोलीस शिपाई रईस मुलानी यांनी अत्यंत मोलाची व परिश्रमपूर्वक कामगिरी बजावली आहे. 

या पथकाने रात्री‑दिवस कष्ट घेऊन पुरावे गोळा करणे, संशयितांचा माग काढणे व त्यांना ताब्यात घेणे यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावली आहे. सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीपसिंग गिल, अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड व प्रभारी पोलीस निरीक्षक श्री श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री भंडारे व तपास पथकाकडून करण्यात येत आहे.

बारामती पोलीस नागरिकांना आवाहन करतात की, सदर फरार आरोपींबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती असल्यास ती जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा पोलीस हेल्पलाईनवर कळवावी; माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल आणि कायदा स्वतःच्या हाती न घेता पोलीस यंत्रणेला सहकार्य करावेअशी माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांनी दिली.

No comments:

Post a Comment