दिवंगत पत्रकार बिपिनराव गायकवाड यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून आर्थिक मदत..! - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 11, 2026

दिवंगत पत्रकार बिपिनराव गायकवाड यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून आर्थिक मदत..!

दिवंगत पत्रकार बिपिनराव गायकवाड यांच्या कुटुंबाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाकडून आर्थिक मदत..!
कोपरगाव:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई शाखा कोपरगावचे शहर कार्याध्यक्ष पत्रकार बिपिनराव गायकवाड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने बुधवार, दि. ४ मार्च रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे पत्रकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे व प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमाणी यांच्या सूचनेनुसार राज्य सरचिटणीस तथा ‘दैनिक समर्थ गांवकरी’चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी बुधवार, दि. ११ मार्च रोजी कोपरगाव येथे गायकवाड यांच्या निवासस्थानी भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई तसेच ‘दैनिक समर्थ गांवकरी’च्या वतीने पत्रकार बिपिनराव गायकवाड यांच्या पत्नी कविता बिपिन गायकवाड यांना आर्थिक मदतीचा धनादेश आणि एक महिन्याचे घरगुती किराणा साहित्य सांत्वन म्हणून प्रदान करण्यात आले.

या प्रसंगी ‘दैनिक समर्थ गांवकरी’चे व्यवस्थापक संजय फुलसुंदर, राज्य मराठी पत्रकार संघाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप, सचिव विजय कापसे, ज्येष्ठ मार्गदर्शक फकीरराव टेके, किसनराव पवार यांच्यासह गायकवाड कुटुंबातील कविता गायकवाड, महेश बिपिन गायकवाड, कल्याणी बिपिन गायकवाड, जागृती बिपिन गायकवाड, प्रकाश बन्सी गायकवाड आदी सदस्य उपस्थित होते.

यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे यांनी गायकवाड कुटुंबीयांचे सांत्वन करताना सांगितले की, पत्रकार बिपिनराव गायकवाड हे अत्यंत मनमिळावू, शांत स्वभावाचे आणि अभ्यासू पत्रकार होते. त्यांनी अल्पावधीतच आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली होती. संघटनेत सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची कार्यपद्धती होती. त्यांच्या अचानक निधनामुळे पत्रकार क्षेत्राची मोठी हानी झाली असून गायकवाड कुटुंबाला या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, अशी भावना व्यक्त करत त्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

No comments:

Post a Comment