मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत पुन्हा एकदा बारामती शहर पोलिसांची प्रभावी कामगिरी..
बारामती :- बारामती शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा यशस्वी छडा लावत पुन्हा एकदा प्रभावी कामगिरी बजावली आहे. बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 0166/2026, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2) प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस हवालदार श्री. यशवंत पवार (तपासी अंमलदार) यांना गोपनीय बातमीदारामार्फत अशी खात्रीशीर माहिती मिळाली की, एक इसम चोरीच्या मोटारसायकली वापरत असून त्या विविध ठिकाणी लपवून ठेवत आहे. या माहितीची पडताळणी करून तात्काळ कारवाई करण्यात आली व सापळा रचून आरोपी नामे ऋषिकेश पिंटू मंडले (रा. निरजणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यास ताब्यात घेण्यात आले.
आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याच्यासोबत एका अल्पवयीन विधी संघर्ष बालकाचा सहभाग देखील असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपासात आरोपीने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या चोरीच्या वाहनांबाबत माहिती दिली. या माहितीच्या आधारे तपास पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शोधमोहीम राबवली व कौशल्यपूर्ण तपास करून चोरीच्या वाहनांची यशस्वी रिकव्हरी केली.
या कारवाईदरम्यान बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील वरील नमूद गुन्ह्याबरोबरच बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील दोन वाहन चोरीचे गुन्हे तसेच वेळापूर पोलीस स्टेशन (जि. सोलापूर ग्रामीण) हद्दीतील एक वाहन चोरीचा गुन्हा अशा एकूण चार गुन्ह्यांमधील मुद्देमाल आरोपी नामे ऋषिकेश पिंटू मंडले याच्याकडून जप्त करण्यात आला. रिकव्हर करण्यात आलेल्या वाहनांमध्ये यामाहा कंपनीची RXG मोटारसायकल, हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, यामाहा कंपनीची आणखी एक मोटारसायकल तसेच होंडा कंपनीची अॅक्टिवा स्कुटी यांचा समावेश आहे. सदर कारवाईमुळे विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे गुन्हे उघडकीस येऊन त्यांची यशस्वी निर्गती करण्यात आली आहे.
ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली असून पोलीस हवालदार श्री. यशवंत पवार (तपासी अंमलदार) यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील पोलीस शिपाई अक्षय सिताफ, पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई अमोल देवकाते, पोलीस शिपाई गिरीश नेवसे, पोलीस शिपाई पोपट कवितके, पोलीस शिपाई विशाल शिंदे, पोलीस शिपाई सागर जामदार तसेच सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री. संदीप जाधव यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन ही कामगिरी यशस्वी केली आहे. तपासाचे मार्गदर्शन पोलीस उपनिरीक्षक श्री. रत्नदीप भंडारे यांनी केले.
सदर उल्लेखनीय कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे.
या कारवाईमुळे मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांवर प्रभावी वचक बसला असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे. बारामती पोलीस नागरिकांना आवाहन करीत आहेत की, वाहन पार्क करताना योग्य लॉकचा वापर करावा, शक्यतो सुरक्षित व CCTV असलेल्या ठिकाणी वाहन उभे करावे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीसांना माहिती द्यावी. थोडीशी खबरदारी घेतल्यास अशा गुन्ह्यांना आळा घालणे शक्य आहे.
प्रभारी पोलीस निरीक्षक
बारामती शहर पोलीस स्टेशन
No comments:
Post a Comment