उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे बारामतीचा नियमित पाणीपुरवठा १० जुलैपासून पूर्ववत - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, July 8, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे बारामतीचा नियमित पाणीपुरवठा १० जुलैपासून पूर्ववत

उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांच्या विशेष पाठपुराव्यामुळे बारामतीचा नियमित पाणीपुरवठा १० जुलैपासून पूर्ववत
बारामती :-बारामती शहराला नीरा डाव्या कालव्यातून मिळणाऱ्या पाण्यावर आधारित पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने काही दिवसांपूर्वी नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाले होते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करण्यासाठी बारामती नगरपरिषदेकडून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात आला होता.

या कठीण काळात बारामतीकरांनी पाण्याचा अत्यंत जबाबदारीने आणि काटकसरीने वापर करून नगरपरिषदेला मोलाचे सहकार्य केले. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे शक्य झाले.

दरम्यान, संत जगद्गुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अखंड पाणीपुरवठा होणे आवश्यक असल्याने पाणीपुरवठा सभापती सौ. मनीषा समीर चव्हाण, नगराध्यक्ष श्री. सचिन सदाशिव सातव आणि मुख्याधिकारी श्री. पंकज भुसे यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्याकडे नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन तातडीने सुरू करण्याची मागणी केली.

या मागणीची तत्काळ दखल घेत मा. सुनेत्रावहिनींनी पाटबंधारे विभागाला आवश्यक सूचना दिल्यानंतर सोमवार, दि. ६ जुलै रोजी सायंकाळी ६.४० वाजता वीर धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आले. हे पाणी आज बारामती शहरापर्यंत पोहोचले असून त्यानुसार आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने दि. १० जुलै २०२६ पासून बारामती शहरात दैनंदिन पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, याबाबतचे वेळापत्रक नगरपरिषदेमार्फत जाहीर करण्यात येणार आहे.

नागरिकांनी यापुढेही पिण्याच्या पाण्याचा जपून वापर करावा, पाण्याची नासाडी टाळावी आणि नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मध्यंतरी निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या काळात बारामतीकरांनी अत्यंत संयम आणि जबाबदारी दाखवत पाण्याचा काटकसरीने वापर केला. नागरिकांच्या या मोलाच्या सहकार्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे शक्य झाले. त्याबद्दल सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार. तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे बारामती शहराकडे नेहमीच विशेष लक्ष असून, त्यांच्या सकारात्मक हस्तक्षेपामुळेच नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन वेळेत सुरू होऊन शहराचा नियमित पाणीपुरवठा पूर्ववत करणे शक्य झाले.
– सौ. मनीषा समीर चव्हाण
पाणीपुरवठा सभापती, बारामती नगर परिषद

पाणीटंचाईच्या काळात बारामती नगरपरिषद प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केले. या नियोजनाला राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सकारात्मक सहकार्य लाभले. त्यांच्या तातडीच्या पाठपुराव्यामुळे कालव्याचे आवर्तन सुरू झाले असून, आता शहरातील नागरिकांना पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू करता येत आहे. भविष्यातही नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
– श्री. सचिन सदाशिव सातव
नगराध्यक्ष, बारामती नगर परिषद

No comments:

Post a Comment