*बसचालक आणि रिक्षाचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन*
बारामती, दि. १: रस्ता सुरक्षा कार्यक्रमाअंतर्गत बसचालक आणि रिक्षाचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले.
बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, मोटार वाहन निरीक्षक जयवंत पोळ, चंद्रमोहन साळोखे आदी उपस्थित होते.
श्री. भोईटे म्हणाले, वाहनचालकांवर प्रवाशांची मोठी जबाबदारी असल्यामुळे त्यांनी नियमांचे पालन करुन वाहन चालवावे. बारामती परिवहन विभाग अपघातमुक्त करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. अधिकाधिक वाहनचालकांनी या शिबीरामध्ये सहभागी होऊन आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असेही ते म्हणाले.
श्री. केसकर म्हणाले, रस्ते अपघात ही एक गंभीर समस्या असून रस्ता सुरक्षितता ही परिवहन विभागाची महत्वाच्या जबाबदारीपैकी एक आहे. वाहनचालकांच्या वाहन चालविण्याच्या कौशल्यामध्ये त्याचे आरोग्य सदृढ असणे गरजेचे आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अशा प्रकारची शिबीरे महत्वाची आहेत, असेही ते म्हणाले.
या शिबिरामध्ये बसचालक व रिक्षाचालक, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांचे डोळे, रक्तदाब व रक्तशर्करा आदी तपासण्या मोफत करण्यात आल्या. तपासणीअंती सुमारे २०० वाहचालकांना चष्म्याचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment