महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील, राम सातपुते यांचाही पाठिंबा;प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला ग्वाही.. - vadgrasta

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 17, 2024

महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील, राम सातपुते यांचाही पाठिंबा;प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला ग्वाही..

महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील, राम सातपुते यांचाही पाठिंबा;प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाला ग्वाही..
धाराशिव/सोलापूर (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने वृत्तपत्रांना ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे वृत्तपत्र खरेदी करणार्‍यांना उत्पन्न करात वार्षिक 5 हजार रुपये सूट द्यावी, ही मागणी लावून धरली आहे. धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील आणि सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनीही पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची भेट घेऊन चर्चा केली. कोरोना वैश्‍विक महामारीनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात वृत्तपत्र व्यवसायावर मोठा परिणाम झाला. वृत्तपत्र खप आणि जाहिरातींचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी वृत्तपत्र व्यवसायावर अवलंबून असलेले पत्रकार आणि इतर कर्मचार्‍यांसमोर रोजगाराचाच प्रश्‍न निर्माण झाला आहे. देशभरात छोट्या-मोठ्या वृत्तपत्रांचा 35 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. यासाठी केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्‍या आयकरदात्यांना उत्पन्न करात वार्षिक 5 हजार रुपयांची सूट द्यावी, अशी मागणी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी केली. या मागणीला धाराशिव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील, सोलापूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी पाठिंबा देत या निवडणुकीत आपला विजय झाल्यास लोकसभेत हा विषय प्राधान्याने मांडला जाईल, असे अभिवचन दिले. यावेळी पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, राज्य कार्यकारणी सदस्य बाबासाहेब देशमाने, पत्रकार संघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय पाटील, पत्रकार संघाचे धाराशिव येथील पदाधिकारी श्रीराम क्षीरसागर, रामेश्‍वर डोंगरे, सय्यद कलीम मुसा यासह पत्रकार उपस्थित होते.

राज्यातील 100 उमेदवारांना पत्रकार संघ देणार निवेदन-वसंत मुंडे
केंद्र सरकारने वृत्तपत्र खरेदी करणार्‍यांना उत्पन्न करात वार्षिक 5 हजार रुपये सूट द्यावी, ही मागणी केंद्र सरकारकडे लावून धरली आहे. या मागणीला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेवारांकडून पत्रकार संघाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष, स्थानिक पदाधिकारी उमेदवारांच्या भेटी घेत आहेत. राज्यातील 100 उमेदवारांना पत्रकार संघ निवेदन देणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

No comments:

Post a Comment