रात्रीच्या वेळेस घरात डोकावल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या;चौघांना अटक..
बारामती:- संशयामुळे तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय याबाबत मिळालेली माहिती अशी की,महाबळेश्वर
तालुक्यातील भोसे गाव परिसरात पर्यटनासाठी
गेलेल्या भिगवण येथील तरुणाचा बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या झिरो क्रमांकाच्या गुन्ह्याच्या आधारे पाचगणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली आहे.मृत तरुणाचे नाव अक्षय रमेश जाधव (वय २५, रा.भिगवण, ता. इंदापूर) असे आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार,अक्षय जाधव हा त्याचा मित्र विशाल अजित जाधव (रा.बोरी) व इतर मित्रांसमवेत ८ जुलै रोजी महाबळेश्वर येथे
पर्यटनासाठी गेला होता. सायंकाळी त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील भोसे गावातील 'अतिथी व्हिला हॉटेल अँड लॉज' येथे मुक्काम केला. रात्री सर्व मित्रांनी मद्यप्राशन केले. त्यावेळी अक्षयने अधिक प्रमाणात मद्यप्राशन केल्याने मित्रांनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.त्यानंतर तो हॉटेलच्या खोलीत झोपण्यासाठी गेला.
रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास मित्रांनी त्याला जेवणासाठी बोलावण्याचा प्रयत्न केला असता तो खोलीत दिसून आला नाही. खोलीच्या मागील बाजूची खिडकी उघडी असल्याने तो तेथून बाहेर गेला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मित्रांनी परिसरात शोधाशोध सुरू केली.दरम्यान, संशयित आरोपींच्या घरात अक्षय डोकावत असल्याचा संशय स्थानिकांना आला. यावरून संतप्त झालेल्या काही स्थानिकांनी अक्षयला लाकडी काठ्या,दांडे तसेच लाथाबुक्क्यांनी अत्यंत अमानुषपणे बेदम मारहाण
केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. काही
वेळाने हॉटेलपासून सुमारे २०० मीटर अंतरावर अक्षय
गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.जखमी अक्षयला प्रथम पाचगणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी वाई येथील शासकीय रुग्णालयात
हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्यानंतर त्याला बारामती येथील डॉ. बोके रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून अक्षय जाधव याला मृत घोषित केले.या प्रकरणी सूर्यकांत चंद्रकांत गोळे (रा. भोसे, ता.महाबळेश्वर), अविनाश सतीश भोसले (रा. बावधन, ता.वाई), राहुल जनार्दन राजपुरे (रा. कणूर, ता. वाई) आणि अमोल गंगादेव वाडकर (रा.चिखली, ता. वाई)यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेला झिरो क्रमांकाचा गुन्हा पाचगणी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्यानंतर पाचगणी पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेत चौघांनाही अटक केली असून,पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment